आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संमेलन आयाेजकांचा माफीनामा, नयनतारा यांना पुन्हा निमंत्रण देण्याची उपरती मात्र नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यवतमाळमध्ये १२ जानेवारीपासून सुरू हाेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारल्यामुळे टीकेची झाेड उठल्यानंतर ताळ्यावर आलेल्या आयाेजकांनी २४ तासांतच लेखी माफी मागितली. तसेच बहिष्कार मागे घेण्याची विनंतीही संमेलनाचे कार्याध्यक्ष डाॅ. रमाकांत काेलते यांनी  साहित्यिकांना केली. मात्र पुन्हा नयनतारा यांना निमंत्रण देण्याची उपरती झालेली दिसत नाही. नयनतारा यांच्या उपस्थितीवर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अाक्षेप घेतला हाेता. हेच कारण पुढे करत अायाेजकांनी संमेलन निर्विघ्न पार पाडण्यासाठी असा कटू निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले हाेते. मात्र अाता मात्र दस्तुरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अापल्या पक्षाचा विराेध नसल्याचे जाहीरपणे सांगितले अाहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयानेही सरकारकडून आयाेजकांवर दबाव असल्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तरीही मग ‘मानभावी’ आयाेजकांना नयनतारा यांना पुन्हा निमंत्रण देण्याची ‘सुबुद्धी’ का सुचली नाही, असा प्रश्न साहित्यिकांमधून विचारला जात आहे. ज्येष्ठ लेखिकेला निमंत्रण नाकारण्याचा उद्दामपणा करणाऱ्या आयाेजकांनी माफी मागावी, ही मागणी आयाेजकांनी मान्य केली. मात्र नयनतारा यांना पुन्हा मानाने संमेलनात बाेलावण्याची किंवा त्यांचे प्रस्तावित भाषण संमेलनात वाचून दाखवण्याची उपरती जाेपर्यंत  आयाेजकांना हाेत नाही ताेपर्यंत बहिष्कार कायम राहील, अशी भूमिका साहित्यिकांनी घेतली आहे.