एनबीसीसीने लावली 'जेपी / एनबीसीसीने लावली 'जेपी इन्फ्राटेक'साठी बोली 

Feb 17,2019 10:03:00 AM IST

नवी दिल्ली- सरकारी कंपनी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) आणि मुंबईतील सुरक्षा ग्रुप यांनी दिवाळखोरीत निघालेली कंपनी जेपी इन्फ्राटेकचे अधिग्रहण आणि त्यांच्या नोएडा गृह प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी बोली लावली आहे. बोलीच्या रकमेचा अद्याप खुलासा झालेला नाही. एनबीसीसीचे अध्यक्ष आणि एमडी अनुपकुमार मित्तल यांनी सांगितले की, कंपनी जेपी इन्फ्राटेकचे अधिग्रहण करून आणि २० हजारांपेक्षा जास्त घरांचे काम पूर्ण करण्यास इच्छुक आहे. त्यांनी बँका, ग्राहक आणि एनबीसीसीसाठी हे फायद्याचे ठरणार असल्याचे म्हटले आहे. एनबीसीसीने १५ फेब्रुवारी रोजीच कागदपत्रे जमा केली आहेत.

याआधी यासाठी एनबीसीसी, कोटक इन्व्हेस्टमेंट, सिंगापूरची क्यूब हायवेज आणि सुरक्षा ग्रुप यांची निवड करण्यात आली होती. कोटक आणि क्यूब हायवेज यांनी अखेरच्या दिनांकापर्यंत म्हणजेच १५ फेब्रुवारीपर्यंत कागदपत्रे जमा केली नव्हती. यावर १८ फेब्रुवारी रोजी विचार होणार आहे.

नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये जेपी इन्फ्राटेकचे अनेक प्रकल्प अडकलेले आहेत. एनसीएलटीने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी २०१७ मध्ये आयडीबीआयच्या नेतृत्वात बँकांच्या समूहाची याचिका स्वीकारली होती. त्या वेळी सर्वात मोठा दावेदार म्हणून सुरक्षा ग्रुप समोर आला होता. जेपी इन्फ्राटेकवर ९,८०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातील ४,३३४ कोटी रुपये आयडीबीआय बँकेचे आहेत. इतर कर्जदात्यांमध्ये आयआयएफसीए, एलआयसी, एसबीआय, कॉर्पोरेशन बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, युनियन बँक, आयएफसीए, जेअँडके बँक, अॅक्सिस बँक आणि श्रेई इक्विपमेंट फायनान्स यांचा समावेश आहे.

X