आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र; माजी आमदाराच्या उमेदवारीत संभ्रम झाल्यामुळे दर्शवली नाराजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - राष्ट्रवादी काँग्रेसने पैठण मतदारसंघातील माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या उमेदवारीत संभ्रम निर्माण केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या युवराज चावरे या कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहीले.  

युवराज चावरे यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे...
साहेब ज्या संजय वाघचौरे यांनी गेल्या 20 वर्षांपासून पैठण तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवली त्यांनाच डावलून पक्षाने काल प्रवेश केलेल्या एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट उमटली आहे. संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीचे अनेक कार्यक्रम स्वखर्चातून घेतले. पक्षवाढीसाठी पायाला भिंगरी लावल्यागत फिरत पक्ष बांधणी केली. आणि त्यांच्यावर अन्याय झाला. पवारसाहेब, अजित दादा व जयंत पाटील साहेब आपल्या शब्दाच्या पुढे कधीही न गेलेले संजय वाघचौरे यांच्यावर हा अन्याय का? याकरिता हे रक्तरंजित पत्र लिहित आहे. साहेब अजुनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, हि नम्र विनंती. 

अन्यथा पैठण तालुक्यात निष्क्रीय लोकांच्या हातात उमेदवारी गेल्याने पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. अशा आशयाचे पत्र पैठण तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ता युवराज चावरे यांनी लिहिले. 

उमेदवारी अर्ज छाननीत संजय वाघचौरे यांनी मला 'राष्ट्रवादी'चा अधिकृत एबी फॉर्म मिळाला म्हणत गोर्डेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र, वाघचौरे यांनी दाखल केलेल्या एबी फॉर्ममध्येच त्रुटी आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने वाघचौरे यांचा आक्षेप फेटाळत, गोर्डे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. या संभ्रमामुळे कार्यकर्ता युवराज चावरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित नाराजी दर्शवली.