political / मुख्यमंत्र्यांच्या घरासमाेर ‘राष्ट्रवादी’चे आंदाेलन; मंत्री प्रकाश मेहता यांना हटवण्याची मागणी

‘गली गली में शोर है प्रकाश मेहता चोर है, अशी घोषणा आंदोलन कार्यकर्ते देत होते

विशेष प्रतिनिधी

Jun 09,2019 09:46:00 AM IST

मुंबई - राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर गलिच्छ वस्ती पुनर्निर्माण योजनेत व्यावसायिकाला अधिकचा लाभ पोहोचवल्याचा अाराेप असून लोकायुक्तांनीही चाैकशी अहवालात तसा ठपका ठेवल्याचा आहे. असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीने शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाजवळ आंदोलन करत मेहतांच्या राजीनाम्याची मागणी केली.


‘गली गली में शोर है प्रकाश मेहता चोर है, मंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, भाजप सरकारचा निषेध असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो’, अशा जोरदार घोषणा आंदोलन करणारे कार्यकर्ते देत होते.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यात सहभागी होते. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना मलबार हिल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्या निवडी मागच्या आठवड्यात झाल्या. त्यानंतर महेबूब शेख यांच्या नेतृत्वात झालेले हे पहिलेच आंदोलन हाेते. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मेहता यांचे जुने प्रकरण पुढे आले आहे. त्यावरून मेहता यांची गच्छंतीची शक्यता आहे.

X
COMMENT