आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराला वेळ मिळू नये म्हणून माझ्या अटकेचा कट; पुतण्याचा काकांवर आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - औरंगाबादेत माझ्यावर फसवणुकीचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याची माहिती मी माझ्या उमेदवारी अर्जाच्या शपथपत्रात नमूद केली होती. मात्र, निवडणुकीत दोन दिवस अगोदर माझ्या नावे प्रशासनावर दबाव आणून अटक वॉरंट काढून मला प्रचार करायला वेळ मिळू नये म्हणून अटकेचा काकांनी कट रचला. मी स्वत:हून न्यायालयात गेल्याने मला गुन्ह्यात जामीनही मिळालेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर खोटे आरोप करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये शनिवारी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत सांगितले. 

बीड येथे राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषदेत क्षीरसागर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादेतील एका गुन्ह्यात मला २० वर्षांत कधीही नोटीस निघाली नाही. न्यायालयात हजर न राहिल्यामुळे अटक वॉरंट  काढण्यात आले. परंतु शुक्रवारी औरंगाबाद उच्च न्यायालयाने या गुन्ह्यात   माझा १५ हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याच गुन्ह्याची माहिती लपवली, असा अारोप माझ्यावर आमच्या काकांनी केला होता.  परंतु माझ्या उमेदवारी अर्जात सदरील गुन्ह्याचा उल्लेख मी केलेला आहे. आमच्या काकांनी या प्रकरणात कट रचत पोलिसांना मला वॉरंट बजावायला लावले.  प्रचाराच्या दोन दिवस अगोदर मला अटक करायला लावून आयुष्यातून उठवायचा त्यांचा डाव होता. काकांनी माझ्या नावे द्वारकादास मंत्री बँकेचे ५ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. ती रक्कम त्यांच्याच नावे ट्रान्सफर झालेली आहे. पण यांनी मला वैयक्तिक त्रास देण्याचे काम केले आहेे. या वेळी फारुक पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, अॅड. तौसिफ यांची उपस्थिती होती.
 

त्यांच्या समोरासमोर बसण्याची माझी तयारी 
आमच्या काकाचा मोठ्या मुलाच्या संपत्तीच्या टॅक्सचे आकडे २  वर्षांत कोटीने कसे काय वाढतात, हा प्रश्न आहे. बोलायला खूप काही आहे, पण आता मतदार २१ तारखेची वाट पाहत आहेत. आमच्या काकांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा समोरासमोर येऊन कुठल्याही प्रकरणाबाबत चर्चा करावी. खरे कोण आणि खोटे कोण, हे समोर येईल. विकासकामावर ते बोलत नाहीत ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे, असेही संदीप क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 

आमचा संबंध नाही 
त्या प्रकरणाविषयी अर्थाअर्थी आमचा काहीही  संबंध नाही. त्यांनी केलेले आराेप तथ्यहीन आहेत. कायदा प्रशासनाने केलेली ती एक प्रक्रिया आहे.
- जयदत्त क्षीरसागर, उमेदवार, शिवसेना बीड