सातारा- आम्ही काँग्रेससोबत गेली अनेक वर्षे आहोत. आताही आम्ही लोकसभेच्या जागावाटपाबाबत काँग्रेसशी वाटाघाटी करीत आहोत. असे असताना हा भाजप मध्येच कोठून आला, असा सवाल करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि भाजप युतीची चर्चा सपशेल फेटाळून लावली. काँग्रेससोबत वाटाघाटी सुरू असून, तो तिढाही सामंजस्याने सोडवू व आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेससोबतच लढणार असल्याचा पुनरूच्चार केला.
यावेळी पवारांनी विविध विषयांवर टोलेबाजी केली. महायुती व त्यांच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. गोपीनाथ मुंडे यांना लक्ष्य करताना पवार म्हणाले, की मी आजपर्यंत 14 वेळा विधानसभा व लोकसभा लढविली आहे. त्यात सर्व वेळा मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. आता काही लोक माझा पराभव होईल, अशी भीती असल्याने राज्यसभेत गेल्याचे सांगत आहेत. मात्र अशी भीती पराभूत होणा-यांना असते. कधीही पराभव न पाहिलेल्या माझ्यासारख्यांना त्याची भीती कधीच नसते, असा टोला मुंडेंना हाणला.
विकासाच्या कामात राजकारण आणू नये असे सांगत पवारांनी राज ठाकरे व त्यांच्या टोलविरोधी आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली. जगात सर्वत्र खासगी कंपन्यांद्वारे अनेक विकासाची कामे केली जात आहेत. रस्ते बांधणे हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. टोल घेणे ही पद्धत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आहे. टोल घ्यायचे बंद केले तर रस्ते दुरुस्त कोण करणार. यामुळे गाड्याचे नुकसान होते. त्यामुळे टोलवरून राजकारण करू नये, असा सल्ला पवार यांनी राज यांना दिला आहे.
मोदी यांच्या भेटीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवारांनी मोदींशी राजकीय भेट कधीही घेतली नसल्याचे सांगितले. मी देशाचा कृषिमंत्री असताना अनेकदा राज्याच्या दौ-यांवर असतो. त्यावेळी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमादरम्यान भेटत असतो. त्यावेळी तो कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे हे मी पाहत नाही. राजकीय क्षेत्रात वावरत असताना इतकी अस्पृश्यता असता कामा नये. राजकीय विचार व मते वेगळी असू शकतात. पण कोणाशी भेटणे अयोग्य ठरत नाही. आपण सुसंस्कृत जगात वावरतो मग असे 'चीप' राजकारण यात आणू नये, असे सांगत वैचारिक प्रगल्भता काय असते ते पवारांनी दाखवून दिले.