आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत राष्ट्रवादीला अंतर्गत कलहाचे ग्रहण; गटबाजी थोपवण्याचे आव्हान!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचे मोठे ग्रहण लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत ही गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. चार विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. 


जिल्ह्यातील चार पैकी दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. जिंतुरातून आ.विजय भांबळे तर गंगाखेडमधून डॉ.मधुसूदन केंद्रे हे विधानसभेवर आहेत. या शिवाय पाथरी मतदारसंघात मजबूत पकड असलेले जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी हे विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र अंतर्गत गटबाजीने पक्ष मोठ्या प्रमाणावर ग्रासलेला आहे. याचाच परिणाम नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरही दिसून आला. ताब्यात असलेल्या गंगाखेड व जिंतूर मतदारसंघातूनच राष्ट्रवादी पिछाडीवर राहिली. या उलट परभणी व पाथरीतून पक्षाचे उमेदवार राजेश विटेकर यांनी मोठे मताधिक्य मिळवले. लोकसभेतील पराभवाची मिमांसा करताना पक्षांतर्गत असलेली गटबाजीच कारणीभूत असल्याचे चित्र समोर आल्यानंतर नेतेमंडळींत असलेली खदखद थेट मुंबईतच पक्षश्रेष्ठींसमोर हातघाईवर आली. उमेदवार विटेकर समर्थक व गंगाखेडचे आ. डॉ. केंद्रे यांच्या समर्थकांत झालेला राडा हा लोकसभेत गंगाखेडमधून विटेकर हे पिछाडीवर राहिल्यानेच झाला. याचा परिणाम जिल्ह्यातील नेतेमंडळीत असलेली बेदिली समोर येण्यात झाला. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना पक्षाला या सर्व बाबींचा विचार करीत गटबाजी थोपवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार हे त्यादृष्टीने जिल्ह्यातील नेत्यांना कानमंत्र देतील, यातही शंका नाही. 


गंगाखेड, जिंतूरवर पक्षाची मदार : राष्ट्रवादीकडे विद्यमान गंगाखेड व जिंतूर हे दोन मतदारसंघ आहेत. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत हेच मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहतील, असे चित्र स्पष्ट आहे. तरी देखील चारही मतदारसंघांतून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आ.भांबळे व आ.केंद्रे हे दोघेही त्या-त्या मतदारसंघातून विद्यमान असल्याने उमेदवार म्हणून अपेक्षित आहेत. मात्र गंगाखेडमध्येही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास अनेक दिग्गजांनी दंड थोपटले आहेत. काही मंडळी थेट पक्षाश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली आहेत. जिंतूरबाबत मात्र आ.भांबळे हेच एकमेव उमेदवार म्हणून दिसत आहेत.
 

 

लोकसभेमुळे परभणीवर दावा
लोकसभेत परभणी मतदारसंघातून राष्ट्रवादीला ३० हजारांचे मताधिक्य मिळाले. हाच धागा पकडून काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा, यादृष्टीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यात माजी महापौर प्रताप देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, किरण सोनटक्के यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा पुढाकार आहे. 

 

पाथरीवरही भक्कम दावा
आ.बाबाजानी दुर्राणी यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पाथरीत लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकरांना २५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. २००९ पूर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. या अनुषंगाने  विटेकरांसह  जि. प. उपाध्यक्षा भावना नखाते व अन्य काही जण पाथरीतून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र  काँग्रेसच सुरेश वरपुडकरांनी जोरदार तयारी केली आहे.