Maharashtra Flood / राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने पुरग्रस्तांसाठी 50 लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द


पुरग्रस्त जिल्ह्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासोबतच विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर

तुषार खरात

Aug 13,2019 04:26:00 PM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्त मदत निधीचा सुमारे 50 लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, शिवाय पुरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतच्या 25 विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकण, विदर्भ या जिल्हयात पुराने हाहाकार माजवल्यानंतर आता तिथे मदतीची आवश्यकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आवश्यक ती मदत पोचवण्यात आली आहे. शिवाय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्त भागात जावून पुरग्रस्तांची विचारपुस केली आहे. पुढील दोन दिवस कोल्हापूर, सांगली, कराड याठिकाणी पुरग्रस्तांच्या भेटी घेणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या-त्या भागात मदत पोचवत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानुसार आज राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने 50 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विद्या चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

X
COMMENT