आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसातही सभा घेणाऱ्या पवारांमुळे हवामान बदलाची राष्ट्रवादीला आशा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक अडसूळ 

मुंबई - निवडणुकीपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आपलेसे करून भाजप-शिवसेनेने अर्धी लढाई जिंकल्याचे म्हटले जात होते. मात्र साताऱ्यात शुक्रवारी धो-धो पावसात सभा घेणाऱ्या शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओज प्रचंड व्हायरल झाले. या ‘परती’च्या पावसाने बॅकफूटवरील आघाडीच्या शिडात पुन्हा हवा भरली आहे. ७९ वर्षांच्या पवारांनी या रणधुमाळीत थोडथोडक्या नव्हे, तर तब्बल ६० सभा घेऊन मैदान गाजवल्याचे चित्र दिसले. 

७ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पण उमेदवार निश्चितीपूर्वीपासूनच पवार यांनी सभांचा धडाका लावला. १ ऑक्टोबरला उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे प्रचाराचा नारळ फोडला. १९ ऑक्टोबरपर्यंत पवार यांच्या २१ जिल्ह्यांत ६० सभा झाल्या. पवारांनी दिवसाला ३ ते ४ सभा घेतल्या. १७ ऑक्टोबरला नाशिक जिल्ह्यात त्यांच्या सर्वाधिक पाच सभा झाल्या. त्यांनी जितेंद्र आव्हाड व जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीही हजेरी लावली. सर्व सभांना पवार हेलिकाॅप्टरनी गेले.
 
कोकणातील चिपळूण व पुणे जिल्ह्यातील भोर येथील सभा ढगाळ हवामानांमुळे रद्द कराव्या लागल्या. राष्ट्रवादी विधानसभेच्या ११८ व लोकसभेची एक जागा लढवत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व इतर पुरोगामी पक्षांची महाआघाडी आहे. पण विरोधी बाजूने एकटे पवार लढले. बरेच साथी सोडून गेलेले असताना व प्रकृती बरी नसतानाही पवारांनी दाखवलेल्या लढाऊ बाण्याचे विरोधकांनीही कौतुक केले, हे विशेष. 
 

शेवटची सभा बारामतीत घेण्याची परंपरा यंदाही कायम 
शरद पवार हे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शेवटची सभा आपल्या गावी बारामतीतच घेतात. त्यांचा प्रचाराचा शेवटचा दिवस खास असतो. या वेळी त्यांनी शेवटच्या दिवशी तीन सभा घेतल्या. सकाळी आपला नातू रोहित याच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात, दुपारी दत्तात्रय भरणे यांच्यासाठी इंदापुरात आणि शेवटची सभा पुतणे अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात घेतली.
 
शरद पवारांनी एकूण ६० सभा घेतल्या. सर्वाधिक सभा त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातच घेतल्याचे दिसते.
27  प. महाराष्ट्र
11  मराठवाडा
03 सभा मुंबई-ठाण्यात
11 उ.महाराष्ट्रात 
08 विदर्भ
 

अन् शब्द खरा केला
प्रचाराच्या १६ दिवसांच्या झंझावातात शरद पवार ५ आणि ६ ऑक्टोबर असे दोन दिवस मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले. या दोन दिवसांत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना २० पेक्षा अधिक मुलाखतीही दिल्या. प्रचाराची शेवटची सभा संपल्यावर त्यांनी बारामतीत विश्रांती घेऊन दिलेला आपला शब्द खरा केला.