आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी फोडण्याचे काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचे काम नक्की करु, असे म्हटले.
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी अहिर यांचे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सचिन अहिर यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंनी जे स्वप्न पाहिले ते शहरांच्या विकासाचे स्वप्न पुढे नेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिकपणे केले आहे. महाराष्ट्रात शहरांची संख्या वाढत असून त्यामुळे नागरिकांचे प्रश्न देखील वाढत आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडे एक स्वप्न आहे. त्या स्वप्नात मी त्यांची साथ देईल. आदित्या ठाकरेंकडे राजकारणाचे स्पिरिट आहे. मी त्यांच्यावर याआधी टीका केली होती, मात्र त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवली. ते त्यांच्या विचारातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करत आहेत." असे अहिर म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद माझ्यासोबत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना कोणताही पक्ष फोडायचा नसून शिवसेना वाढवायची असल्याचे अहिर म्हणाले. राज्यभरातील माझे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेशास उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कार्यक्रम घेऊ, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी आदित्य ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "काही दिवसांपासून सचिन अहिर यांच्याशी चर्चा सुरू होती. त्यावेळी महाराष्ट्रात काम करायचे असेल तर सोबत काम करावे लागेल हे लक्षात आले. त्यानंतर सचिन अहिर यांनी शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्ती केली आणि मग मी त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट करुन दिली. त्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. याचा शिवसेनेला मोठा फायदा होईल. शिवसेनेची आणि महाराष्ट्राची स्वप्नं त्यामुळे पूर्ण होतील." असे अदित्य म्हणाले.
शरद पवार हृदयात, तर शरीरात उध्दव आणि आदित्य राहतील
यावेळी अहिर यांनी आपण हा निर्णय शरद पवारांना सांगितला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "गेल्या आठवड्यात शरद पवारांची भेट झाली. त्यांना माझ्या मतदारसंघाची माहिती दिली, पण माजा निर्णय त्यांना सांगू शकलो नाही. शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आम्ही राष्ट्रवादी तोडण्याचे काम करणार नाही, तर शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम करू."
कोण आहेत सचिन अहिर?
सचिन अहिर मुंबईतील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे. मामा अरुण गवळी यांनी सचिन अहिर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आणले आणि ते 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या आघाडी सरकारमध्ये 2009 मध्ये सचिन अहिर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी विराजमान झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव झाला.शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी वरळी मतदारसंघात अहिर यांचा पराभव केला. यानंतर सचिन अहिर यांना राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.