आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NCP MLA Rana Jagjit Singh On The Way To BJP, How Will Work With Nimbalkar Of Shiv Sena?

भाऊबंदकीचे आता युतीत पडसाद, राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंंह भाजपच्या वाटेवर, सेनेच्या निंबाळकरांशी कसे सूर जुळणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह यांची उमेदवारी निश्चित मानली जात हाेती. मात्र ऐनवेळी त्यांनीच पक्षाला रामराम करुन भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आता राणांना आव्हान देऊ शकेल असा उमेदवार शाेधण्याचे राष्ट्रवादीसमाेर आव्हान असेल. माजी मंत्री पद‌्मसिंह पाटील व त्यांचे पूत्र आमदार राणा जगजितसिंह हे शरद पवारांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांचा भाजप प्रवेश हा पवारांसाठी माेठा धक्का मानला जाताे. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र आता राणांना पक्षात घेऊन भाजप हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. विद्यमान शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडूनच राणाजींना तीव्र विराेध हाेऊ शकताे. या दाेन्ही परिवारात अाधीच टाेकाला गेलेल्या 'भाऊबंदकी'तील वादाचे लाेकसभेपाठाेपाठ विधानसभेलाही पडसाद उमटू शकतात.  उस्मानाबादचे राजकारण गेल्या ५० वर्षांपासून माजी मंत्री पद्मसिंह पाटील- पवनराजे निंबाळकर या दोन घराण्यांभोवतीच फिरते. पात्रे बदलली, परंतु या दोन घराण्यांच्या व्यतिरिक्त अन्य तिसऱ्या कोणाचा यात अद्याप शिरकाव झाला नाही. पाटील घराण्याची सूत्रे सध्या पद्मसिंह यांचे पुत्र माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह यांच्याकडे आहेत. पद्मसिंह पाटलांच्या भगिनी सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत. या नातेसंबंधामुळेच पद्मसिंह पाटलांना २४ वर्षे मंत्रिपद लाभले. राणांना आमदारकी, मंत्रिपद मिळाले. लाेकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीने राणा यांना उमेदवारी दिली हाेती, मात्र पवनराजेंचे पुत्र ओमराजे यांनी त्यांचा पराभव केला. 

राणा जगजितसिंह भाजपत गेल्यास राष्ट्रवादी देणार बाहेरचा उमेदवार 
२०१४ पासून राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपत गेले, त्यामुळे पवारांना धक्केही बसले. परंतु पद‌्मसिंह व राणा जगजितसिंह हे साेयरेच पक्ष साेडून गेल्याने पवारही भडकले आहेत. हे पक्षांतर रोखण्यासाठी अजित पवारांनी राणांना बारामतीला बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याचा काय फायदा झाला नाही. आता पद‌्मसिंह व राणा भाजपात गेले तरी सेनेत असलेल्या भाऊबंदकीशी ते कसे जुळवून घेणार याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. 

जातीय समीकरण 
मराठा 40% 
मुस्लिम 18% 
इतर 24% 
दलित 18%

राजकीय चित्र : अशी होऊ शकते लढत 
उस्मानाबादचे राजकारण सध्या राणा जगजितसिंह- ओमराजे निंबाळकर यांच्याभोवती फिरते. ओमराजे शिवसेनेचे खासदार आहेत. पद्मसिंह पाटील व राणा यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटतात. त्यामुळे राणाजी भाजपमध्ये आले तरी ओमराजे त्यांच्याशी जुळवून घेण्याची शक्यता नाही. या निवडणुकीत नगराध्यक्ष व चुलत बंधू नंदूभैय्या निंबाळकर शड्डू ठोकण्याची शक्यता आहे. राणाजींनी पक्षांतर केले तर त्यांच्या पराभवासाठी बाहेरचा उमेदवार देण्याची व्यूहनीती राष्ट्रवादी करू शकते.  

आर्थिक चित्र : विकासाच्या बाबतीत जैसे थे 
विकासाच्या बाबतीत मात्र निझाम राजवटीत जे चित्र हाेते, तेच कमी अधिक प्रमाणात आजही कायम आहे. १० लोकांना रोजगार देईल, असा एकही उद्योग येथे नाही. केवळ शेती हा एकमात्र उद्योग आहे. परंतु दुष्काळाने तोही होरपळून निघाला. गेल्यावर्षी सरासरीच्या ४८% पाऊस झाला. यंदा सरासरीच्या ३३.१५% पाऊस झाला. उजनीच्या धरणातून थेट पाइपलाइन टाकून पाणी पुरवठ्याची योजना अमलात आली. परंतु नियोजनाच्या अभावी ती केवळ कागदावरच आहे.

- साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तुळजापूर भवानीमातेचे मंदिर या मतदारसंघात आहे. 
- संत गोरोबा काकांची जन्मभूमी, गोरोबा काकांचा वाडा व समाधी मंदिर तेर येथे आहे. 
- ५व्या शतकातील उत्तरेश्वर व त्रिविक्रम मंदिर तेर येथे, इतिहासप्रेमींसाठी आ‌वडते ठिकाण