आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी हल्लाबोल, आता ‘परिवर्तना’तून अाशा; ‘राष्ट्रवादी’ने वाढवला यात्रेतून जनसंपर्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तीन राज्यांत सत्ता गमावल्याने डळमळलेला भाजपचा आत्मविश्वास, शिवसेना व भाजपच्या संबंधांदरम्यान वाढत चाललेला तणाव, दुष्काळी भागातील जनतेच्या मनात सरकारबद्दल असलेला रोष, घटलेला रोजगार, फसलेली कर्जमाफी आणि नोटबंदी अशा सरकारविरोधी बाबी आपल्या पथ्यावर पडू शकतात, याचा अंदाज आल्याने गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकरी आणि बेरोजगारांमधल्या अस्वस्थतेचे मतांमध्ये रूपांतर करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष हे बिरुद पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचे नियोजन केले आहे. 

 

राष्ट्रवादीची रणनीती
पक्षात नेत्यांची ‘संस्थाने’,
पण पथ्यावरच पडणारी

केंद्रीय नेतृत्वाच्या नियोजनानुसार भाजप हा एककेंद्री प्रचारावर भर देतो. याउलट राष्ट्रवादीत एकाहून एक तगड्या नेत्यांची संस्थाने आहेत. यामुळे राष्ट्रवादीची रणनीती बहुकेंद्री स्वरूपाची असते. यंदाच्या निवडणुकीतही तसेच नियोजन आहे. जाहीरनामा व सभांचे नियोजन फक्त राज्यपातळीवरून केले जाणार आहे. प्रमुख नेत्यांवर त्यांच्या भागातील इतर मतदारसंघांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. 

 

सोशल मीडिया सुप्रियांकडे
सोशल मीडियावरील प्रचारासाठी राष्ट्रवादीने खासगी कंपनीचे सहकार्य घ्यायची. मात्र आता पक्षाने तरुणांना साथीला घेत सोशल मीडिया सेल तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सेलची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली आहे.

 

दुहेरी उद्दिष्ट : शिवसेना-भाजपला राेखायचे, काँग्रेसवर करायची कुरघाेडी
हल्लाबोल यात्रांचा धडाका

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला रोखतानाच आपला मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसपेक्षा राज्यात अधिक जागा मिळवणे, अशा दुहेरी उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यासाठी निवडणुकीचे वारे वाहण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात हल्लाबोल यात्रांचा धडाका लावला आहे. 


परिवर्तन संकल्प यात्रा 
आता दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीने सत्ता परिवर्तनाचे आवाहन करण्यासाठी परिवर्तन संकल्प यात्रा काढली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागातून फिरत ही यात्रा आता पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. या यात्रेचा शेवट विदर्भात करण्यात येणार आहे. या माध्यमातून थेट मतदारांशी संपर्क साधण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा जोर आहे. 


असा होणार यात्रांचा फायदा
आधी हल्लाबोल आणि नंतर परिवर्तन संकल्प यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे. या यात्रांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रातील माेदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या चुका, मंत्र्यांचा भ्रष्टाचार आणि सरकारी योजनांमधील त्रुटी थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

प्रचाराचे मुख्य मुद्दे
दुष्काळ, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि राज्याची बिघडलेली आर्थिक घडी.  
राज्यात अद्याप निवडणुकीचे वातावरण तापलेले नाही. तरीही हल्लाबोल व परिवर्तन यात्रांद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुष्काळ, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि राज्याची बिघडलेली आर्थिक घडी या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. आगामी निवडणुकीच्या प्रचारातही हेच मुद्दे आमच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली अाहे.

 

मतांचे गणित असे जुळवणार राष्ट्रवादी काँग्रेस
गतवेळेस काय झाले?

गेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढल्याने धर्मनिरपेक्ष मतांच्या मतविभागणीचा फायदा भाजप आणि शिवसेनेला झाला होता.

 

लोकसभा
34.10%

मते एकत्रितरीत्या काँग्रेस+राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. 

 

विधानसभा
43%

मते एकत्रितरीत्या काँग्रेस+राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. 

 

2019 मध्ये आशा
{यंदा दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याने मतविभागणी टळून चांगले यश मिळेल, असा आपला अंदाज असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
{भाजप आणि शिवसना यांच्यात युती न झाल्यास काँग्रेससोबत आघाडी करून मुसंडी मारण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल.
या शिवाय अॅड. प्रकाश आंबेडकर, हितेंद्र ठाकूर यांच्यासारखे मित्रपक्ष सोबत आल्यास ३५ जागांवर विजय मिळेल, असेही नबाब मलिक यांनी सांगितले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास : एकदाही खासदारांंची संख्या दुहेरी आकड्यांत पोहोचली नाही
1999 : पक्षाची स्थापना
विदेशी नेतृत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाताना राष्ट्रवादीने ६ जागा जिंकल्या. 


2004 : आघाडी केली
१९९९ ते २००४ या पाच वर्षांत काँग्रेसशी जुळवून घेतले. यानंतर राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडीही केली. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ९ खासदार निवडून आणत राज्यात १८.३१ टक्के मतेही मिळवली होती. 


2009 : पुन्हा सत्तेमध्ये
काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ खासदार निवडून आले होते. तर त्यांच्या मतांची टक्केवारी १९.२८ टक्के इतकी होती. पक्षाने राज्यातही दमदार कामगिरी करत सत्ता राखली.


2014 : मोदींचा तडाखा
मोदी लाटेच्या तडाख्यातही महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा सरस कामगिरी करत ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र मतांची टक्केवारी घसरली. पक्षाला या वेळी १६ टक्केच मते मिळू शकली. 
 

बातम्या आणखी आहेत...