Maha Politics / विधानसभा निवडणूक / राष्ट्रवादीला काँग्रेसकडून हव्या सम-समान जागा; काँग्रेसपेक्षा चांगले प्रदर्शन केल्याचा दावा

फाइल फोटो फाइल फोटो

राज्यातून लोकसभेत राष्ट्रवादीला 4 तर काँग्रेसला मिळाली फक्त एक जागा

दिव्य मराठी

Jul 17,2019 10:39:20 AM IST

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय पक्ष आणि आघाड्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत चांगल्या प्रदर्शनाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीने काँग्रेसकडून जास्त जागांची मागणी केली आहे. लोकसभेतील चांगली कामगिरी पाहता आपल्याला काँग्रेस एवढ्याच समान जागा मिळाव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर मंगळवारी बैठक झाली. त्यामध्येच काँग्रससमोर राष्ट्रवादीने हा प्रस्ताव ठेवला आहे.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चर्चेत लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि ईव्हीएमचा मुद्दा देखील महत्वाचा ठरला. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्याचाच दाखला देत राष्ट्रवादीने आघाडीमध्ये सम-समान जागा वाटपाची मागणी केली आहे. आधी परिस्थिती वेगळी होती आणि आता ती बदलली आहे असेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत म्हटले आहे.


महाराष्ट्रात 288 जागांसाठी येत्या दोन ते तीन महिन्यांत निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. त्यावरूनच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1999 पासून आघाडी आहे. परंतु, 2014 ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी वेग-वेगळी लढवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसने 25, राष्ट्रवादीने 20 आणि इतर सहकारी पक्षांनी 3 जागांवरून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीने त्यापैकी 4 आणि काँग्रेसने केवळ एका जागेवरून विजय मिळवला. तत्पूर्वी 2014 च्या लोकसभेत काँग्रेसला केवळ दोन आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. एकूणच राष्ट्रवादीचा निकाल काँग्रेसपेक्षा चांगला होता.

X
फाइल फोटोफाइल फोटो