आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार पळवण्यात गिरीश महाजनांचा हातखंडा; त्यांना आम्ही नव्हे, उद्धव ठाकरे घाबरतात, जयंत पाटलांचा टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पाच वर्षांपासून केंद्र व राज्यात सत्तेत असूनही भाजपला उमेदवार पळवावे लागताहेत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मंत्री गिरीश महाजन यांचा उमेदवारांच्या पळवापळवीत हातखंडा आहे. त्यांना पाहून अाम्ही नव्हे, उद्धव ठाकरे घाबरत असतील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथे आयोजित पत्रपरिषदेत लगावला.

 

भंडारा-गोंदिया येथील लोकसभेच्या जागेसाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेरच्या जागेबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत येथे सक्षम उमेदवार देऊ. काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेऊन माझ्याकडे रावेरची जागा मागितली आहे. त्यावर वरिष्ठांशी बोलून लवकरच निर्णय घेऊ. आम्ही नाकारलेल्या उमेदवारांना आयात करून भाजप उमेदवारी देत आहे. कोल्हापूरच्या सभेसाठी भाजपने चक्क कर्नाटकातून कानडी भाषिक लोकांना रोजंदारीवर आणले, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

 

मोदींनी वाढवले देशावर 31 लाख कोटींचे कर्ज
देश स्वातंत्र्य झाल्यापासून 2014 पर्यंत देशावर 91 लाख कोटींचे कर्ज होते. मोदींनी गेल्या 5 वर्षांत त्यात तब्बल 31 लाख कोटींची भर टाकली. विशेष म्हणजे, प्रथमच संसदेच्या परवानगीशिवाय हे पैसे खर्च झाले आहेत. सभागृहाच्या परवानगीविना रुपयाही खर्च करता येत नसताना मोदींनी मात्र मनमानी पद्धतीने 31 लाख कोटी रुपये खर्च केल्याचे जानेवारी 2019 च्या कॅगच्या अहवालात म्हटले आहे. येथे जनताच नव्हे तर जनतेचे संसदेत प्रतिनिधित्व करणारे खासदारही अनभिज्ञ आहेत. पॉवर जनरेशनमध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यात उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे थकबाकीदार आहेत. 5 वर्षांत भाजप सरकारने 5 वेळा वीज दरवाढ केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.  

 

भाजपने खडसेंच्या निष्ठेचा फुटबॉल केला : जितेंद्र आव्हाड
भाजपमध्ये एवढी वर्षे घालवणारे एकनाथ खडसे यांना या वेळी चातकाप्रमाणे उमेदवारीची वाट पाहावी लागली, असे प्रथमच झाले. खडसेंच्या निष्ठेचा भाजपने फुटबॉल केल्याचा चिमटा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काढला. उद्धव ठाकरे सध्या ‘गिरीश महाजनांना आम्ही घाबरत असल्याचे म्हणत आहेत. खरे तर उमेदवार चोरणारे महाजन यांना उद्धव ठाकरेच घाबरत असावे. कारण तसे नसते तर महाजनांना मातोश्रीवर आतापर्यंत येऊ का दिले नाही हे त्यांना विचारा’, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. या वेळी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. मंडल आयोगाचे पुनर्विलोकन करण्याचा शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...