आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा थेट आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - भाजपने राज्यातील राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. काहींना आमिषे दाखवली जात आहेत. त्यामुळे काहीजण जात आहेत मात्र तरुणांनी शिवस्वराज्य यात्रा उचलून धरली आहे. तरुणांचा व जनतेचा फार मोठा पाठिंबा मिळत आहे अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. पवारसाहेबांमुळे अनेकांना खुप काही मिळाले आहे.मी सभेत सोडून जाणार्‍यांची कारणे सांगितली. सत्तेचा आश्रय हवा म्हणून ते लोक गेले व जात आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

काँग्रेससोबत चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ साहेब उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्याबाबतच्या उलटसुलट चर्चा मान्य नाही. जाणाऱ्यांची सत्तेची सूज कमी झाली आहे. त्यामुळे तरुणांना संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार जास्त आहेत. पक्षाची ताकद जास्त आहे म्हणूनच राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होत आहे असेही जयंत पाटील म्हणाले. लोकसभेत जे केले ते विधानसभेत करतील असं वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेवर माझा पुर्ण विश्वास आहे असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. विधानसभेत व विधानपरिषदेत प्रभावी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही ताकद दाखवून दिली आहे. दुसर्‍या कुठल्या पक्षांचे अस्तित्व ठेवायचे नाहीय. म्हणून पक्ष बदलांचा बाजार भाजपाने मांडला आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

शिवसेनेमुळे भाजपला धोका नाही तर शिवसेनेच्या मुळावरच भाजप येणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. याशिवाय पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना जयंत पाटील यांनी उत्तरे दिली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील भाजपचे सरकार उलथवून टाकण्याची ताकद आणि बळ देण्याचे साकडे विठ्ठलाला घातले.