Home | Maharashtra | Pune | ncp supremo cancels lok sabha election nomination for family reasons

Lok Sabha 2019: शरद पवारांची माढा मतदार संघातून माघार, कौटुंबिक पातळीवर माघार घेण्याचा निर्णय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2019, 06:00 PM IST

नव्या पिढीला संधी मिळावी -पवार

  • ncp supremo cancels lok sabha election nomination for family reasons

    पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माढा मतदार संघातून लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. कौटुंबिक पातळीवर आपण हा निर्णय घेत आहोत असे सांगण्यात आले आहे. कुटुंबातही आपण चर्चा केली. यानंतर स्वतः उभे न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील असे ठरवले. नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस आहे. सोबतच, एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभे रहावे याला काही मर्यादा असाव्यात असे मला वाटते त्यामुळे मी ही निवडणूक नाही लढवण्याचा निर्णय घेतला आहे असेही शरद पवार म्हणाले आहेत.

    माढा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिला जाणार यासंदर्भात चर्चा सुरू आहे. काही माहिती माझ्याकडे आली आहे. परंतु, अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. सोबतच, मी कोणाच्याही भीतीने किंवा चिंतेने माघार घेतलेली नाही. आतापर्यंत मी एकदाही निवडणूक हरलेलो नाही. त्यामुळे या निवडणुकीलाही सामोरे जाण्यास मला आवडले असते. मात्र, एकाच कुटुंबातल्या किती जणांनी लोकसभा लढवावी? याला मर्यादा असायला हवी. विजयसिंह मोहिते पाटील यांनाच माढ्यातून उमेदवारी दिली जाईल का? असा प्रश्न विचारला असता त्याबाबत अजुनही निर्णय झालेला नाही असे पवारांनी स्पष्ट केले.

    शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यावेळी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. काही दिवसांपूर्वीच पवारांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की त्यांच्या कुटुंबातील कुणीही लोकसभा निवडणूक लढवणार नाही. दरम्यान, शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय मोहिते पाटील येथून लढणार अशी शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट सुरू असताना देखील ते माढा येथून निवडून आले होते. महाराष्ट्रात एकूणच 48 लोकसभा जागांपैकी 21 जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. त्यापैकी 4 जागांवर विजय देखील मिळवला होता. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करणार असल्याची चर्चा आहे. यात काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी 22 जागा लढवणार अशी चर्चा आहे.

Trending