political / सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस फिरविणार भाकरी, जिल्ह्यातील चारही जागांवर नवे चेहरे

आरक्षित माळशिरस, मोहोळमधून उमेदवार कोण? याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा 

प्रतिनिधी

Aug 11,2019 10:56:00 AM IST

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चार व मित्रपक्ष असलेल्या शेकापला एक अशा एकूण जागा येतात. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता व सांगोल्यातून गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्याने यंदा पहिल्यांदाच पाचही जागावर नवीन चेहरे असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत रश्मी बागल यांना शब्द दिल्याने करमाळा मतदारसंघ त्याला अपवाद राहणार आहे. पक्षपातळीवर याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी पक्षांकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू आहे.

माढा तालुक्यातून आमदार बबनराव शिंदे हे सलग चार वेळा निवडून आले आहेत, यामुळे आता त्याठिकाणी नवीन चेहरा असला तरी शिंदे कुटुंबातीलच असणार आहे. बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल हे स्वत:च राष्ट्रवादीकडून इच्छुक नाहीत. मुलाखतीलाही त्यांनी दांडी मारल्याने याठिकाणीही पक्षाकडून नव्या दमाच्या व तरुण चेहऱ्याचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहोळ मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील यांच्याकडून होकार आल्यानंतर उमेदवार अंतिम हाेतो, आरक्षित मतदारसंघ असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामुळे राजन पाटील पसंतीचाच उमेदवार राहील, पण तो स्थानिक असेल की आयात ? यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे.

अकलूजचे मोहिते-पाटील आता भाजपवासी झाल्याने माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. यामुळे आता त्याठिकाणी नेतृत्व राहिले नाही ना इच्छुक उमेदवार. यामुळे पक्षाकडून माळशिरसमध्ये उमेदवार कोण ? याची चाचपणी सुरू आहे. मोहिते-पाटील यांच्याविरोधात स्थानिक नेृतत्व पुढे आणण्याची शक्यता आहे. सांगोला मतदारसंघातून मित्रपक्ष शेकापकडून गणपतराव देशमुख ११ वेळा िनवडून आले आहेत, त्यांनी यंदा प्रकृतीच्या कारणावरून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी दावा सांगितला आहे. यावर शेकापने अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

शहर उत्तरमधून तयारी, निर्णयाची प्रतीक्षा...
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघातून काँग्रेसचा सलग तीन वेळा पराभव झाला आहे. यामुळे यंदा ही जागा राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. काही इच्छुक उमेदवार मुलाखतीनंतर तयारीला लागले आहेत. याबाबत आघाडीच्या नेत्यांमध्ये अंतिम निर्णय झाल्यावरच पुढील दिशा ठरणार आहे.

X
COMMENT