Maharashtra Politics / शिवसेना आणि भाजपच्या यात्रांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर सोपवली जबाबदारी तर उदयनराजे असतील स्टार कॅम्पेनर

 रोज 3 विधानसभा मतदार संघांचा दौरा या यात्रेदरम्यान केला जाईल

दिव्य मराठी वेब

Jul 31,2019 03:45:41 PM IST

मुंबई- आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध पक्ष आपापल्या परीने मतदारांना आपल्याकडून करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी शिवसेनेने जन आशीर्वात यात्रा काढली तर भाजपने महाजनादेश यात्रेचे आयोजन केले. आता या यात्रांची सुरुवात झाल्यावर राष्ट्रवादी कसकाय मागे राहणार, त्यांनीही शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली आहे.


मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. विशेष म्हणजे शिवस्वराज्य यात्रेची धुरा नवनिर्वाचीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरुवात होईल.


राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून होईल. रोज 3 विधानसभा मतदारसंघांचा दौरा या यात्रेदरम्यान केला जाईल. पहिला टप्पा बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे संपेल. 16 ऑगस्ट रोजी यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल आणि या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे.

X