आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे “आओ मिलके देश बनायें..’ जाहीरनाम्यात संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारी संस्थांची स्वायत्तता अबाधित राखणे, तसेच खासगी उद्योगक्षेत्राला वित्तीय सहकार्यात वाढ करून रोजगार निर्मितीला चालना देणे यासारख्या राष्ट्रीय प्रश्नांशी निगडित प्रश्नांना हाताळण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. ‘आओ मिलके देश बनायें - हमारा, आपका, हम सबका भारत’ हे घोषवाक्य असलेल्या तीस कलमी जाहीरनाम्याचे सोमवारी मुंबईत प्रकाशन करण्यात आले. शेतकरी, युवा आणि महिला या प्रमुख घटकांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याचा दावा जाहीरनामा समितीचे प्रमुख दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
जाहीरनाम्याच्या प्रस्तावनेत राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे. चुकीच्या निर्णयामुळे शेती आणि शेतकऱ्यांवर ओढावलेले संकट, नोटबंदी आणि घिसाडघाईने राबवलेली जीएसटी करप्रणाली यामुळे अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग, बेरोजगारीमध्ये झालेली प्रचंड वाढ, सरकारी कर्जात दुपटीने झालेली वाढ, वाढत्या किंमती आणि महागाई तसेच भरकटलेल्या परराष्ट्र धोरणामुळे धोक्यात आलेली राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यावर सरकारवर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. याशिवाय गेल्या पाच वर्षांत राजकीय हेतूने घटनात्मक स्वायत्त संस्थांची झालेली तोडफोड तसेच जात, संप्रदाय आणि धर्माच्या आधारे समाजात राजकीय हेतूने माजवलेली दुही या मुद्द्यांच्या आधारेही राष्ट्रवादीने  सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता देशाची आणि समाजाची अखंडता जपण्याचे प्रमुख आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

 

अर्थिक विकासासह इतर प्रश्नांचाही समावेश
त्याचबरोबर आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर भर, कामगार कायद्यात सुधारणा, कर सुधारणा, मानव संसाधन विकास, आरोग्याचा हक्क, महिला व बाल कल्याण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरिक, परराष्ट्र धोरण, नागरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, सामाजिक न्याय, अल्पसंख्याकांशी निगडित प्रश्न, मनरेगा, जल आणि सिंचन विकास, उत्पन्नातील असमानता या विषयावरही जाहीरनाम्यात भर देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, निवडणुका लागण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जनतेकडून प्रश्न मागून आपण जाहीरनामा सादर करणार असल्याचे म्हटले  होते. त्यामुळे जनतेला राष्ट्रवादीचा हा जाहीरनामा कितपत  पटतो, हे तर निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर समजेल. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात चांगल्या जागा निवडून आणेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते व्यक्त करत आहेत. त्या दृष्टीने  राज्यातील सर्व नेते कामाला लागल्याचे चित्र सध्या तरी पहायला मिळत आहे.

 

शेतीत शाश्वत सुधारणेला गती देऊ : वळसे पाटील
कृषी क्षेत्र विकास, उत्पादकता, उत्पन्न आणि बाजारपेठेची उपलब्धता वाढवण्याकडे पुरेसे लक्ष देऊन शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्याचे वचनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. शिवाय देशातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या आश्वासनाचा समावेश जाहीरनाम्यात असल्याची माहिती जाहिरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...