आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंनी सक्रिय व्हावे म्हणून राष्ट्रवादीचे प्रयत्न? मोदींच्या विरोधातील प्रचाराला धार येण्यासाठी खटाटोप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील सर्व प्रमुख पक्ष युती आणि आघाडीच्या जागावाटपात व्यग्र असताना मनसेचे नेतृत्व मात्र निवडणुका लढवाव्यात किंवा नाहीत, या मुद्द्यावरच खल करण्यात गुंतले आहे. अपुऱ्या तयारीनिशी रिंगणात उतरू नये, असे मनसेच्या प्रमुख नेत्यांचे मत असले तरीही मोदींच्या विरोधातील प्रचाराला धार येण्यासाठी किमान राज ठाकरे यांनी प्रचारात सक्रिय असावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. तसे संकेतच राष्ट्रवादीतर्फे देण्यात येत आहेत. राज ठाकरे हे विरोधी आघाडीत असतील, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी नागपुरात केले आहे. 

 

गेल्या निवडणुकीत मोदींना पाठिंबा देत भाजपविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय मनसेच्या चांगलाच अंगाशी आला होता. मनसे यंदा मात्र सावधपणे पावले टाकताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात राज यांच्या निवासस्थानी पार पडलेली मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. पुन्हा एकदा बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाईंसोबत राज ठाकरेंनी चर्चा केली. मात्र, लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे नांदगावकर यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. 

 

मोदींविरुद्ध राज ठाकरे यांचा करिष्मा वापरण्याचा प्रयत्न 
मोदींवर थेट टीका करणाऱ्यांत राज ठाकरे आघाडीवर आहेत. ते 'क्राऊडपुलर' नेते आहेत. मात्र, निवडणुकीत उमेदवार न उतरवण्याचा निर्णय मनसेने घेतल्यास राज ठाकरे यांना प्रचारात सक्रिय राहण्याचे प्रयोजनच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आपल्या कोट्यातील एक किंवा दोन जागा राज ठाकरेंच्या उमेदवारांसाठी सोडून राज ठाकरेंचा प्रचारात उतरण्याचा मार्ग मोकळा करावा, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. 

 

छगन भुजबळ यांचे संकेत 
नागपूरमध्ये छगन भुजबळ यांनी तर राज हे आघाडीत असतील, पण निवडणुकीच्या मैदानात असतील का हे सांगता येणार नाही, असे वक्तव्य केले. काही दिवसांपूर्वी राज यांच्या घरी स्नेहभाेजनासाठी गेलो. ही भेट कौटुंबिक असली तरीही अशा बैठकांत राजकीय चर्चा होतात, असेही ते म्हणाले होते. 

 

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दुजोरा 
मनसेची राष्ट्रवादीसोबत छुपी युती होऊ शकते, या शक्यतेला काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने दुजोरा दिला आहे. यामुळे काँग्रेसच्या उत्तर भारतीय मतांवर परिणाम होईल का, असे विचारले असता हा नेता म्हणाला की, 'गेल्या निवडणुकीत राज यांनी मोदींना पाठिंबा दिला. तरीही मुंबई व उत्तरेतील मतदार भाजपच्या पाठीशी होता. त्यामुळे राज यांच्यामुळे ही मते दुरावतील, अशी भीती निराधार आहे.' 

 

बातम्या आणखी आहेत...