आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९० हजार काेटींचे घाेटाळे करणाऱ्या १६ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची क्लिन चीट, सरकार सर्वत्र अपयशीच; केंद्रासह राज्य सरकारच्या कामकाजावर राष्ट्रवादी नेत्यांचे टीकास्त्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चाळीसगाव : परिवर्तन यात्रेच्या सभेत राज्य व केंद्रातील भाजप सरकारला राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी जुमला, गाजर सरकार असे विशेषणे देत टीका केली. चार वर्षात १६ मंत्र्यांचे ९० हजार काेटीचे घाेटाळे आम्ही बाहेर काढले. परंतु मु‌ख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला क्लिनचीट देत ‌भ्रष्टाचारावर पांघरून घातले असल्याची टीका विधानपरिषदेतील विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. अजित पवार यांनी डान्सबारवरील बंदी न्यायालयात सरकारच्या नाकर्तेपणामुळे टिकली नसल्याचा घणाघात केला. 


दुपारी १२ वाजता बलराम व्यायाम शाळेच्या पटांगणावर झालेल्या सभेच्या व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री फाैजीया खान, माजी खासदार वसंतराव माेरे, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वा‌घ, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमाेद पाटील, अनिल भाईदास पाटील, प्रदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे, आदी उपस्थित हाेते. हिरापुर राेडवरील सबस्टेशनपासून माेटारसायकल रॅली काढण्यात आली. यात कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विजयाच्या जाेरदार घाेषणा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य भुषण पाटील, अमाेल चाैधरी, स्वप्नील काेतकर, नगरसेवक शाम देशमुख, दीपक पाटील, साेनल साळुंखे, मंगेश पाटील, भगवान राजपूत व पदाधिकाऱ्यांनी माेटारसायकल रॅलीत सहभाग घेतला. 

 

चाळीसगावात आकड्यांचे भांडार : राजीव देशमुख 
माजी आमदार राजीव देशमुख यांनी काेणाचेही नाव न घेता थापा मारून आमदारपद मिळविले असल्याची टिका केली. तालुक्यात फक्त विकास कामांच्या नावावर आकड्यांचा खेळ सुरू असल्याचे सांगितले. आकड्यांचे भांडार जमा झाले असून सिंचनासाठी मंजूर निधीची आकडेवारी खाेटी सांगितली जात असल्याचे ते म्हणाले. जवळच्या नातेवाईकांना काॅन्ट्रॅक्ट दिले जात असल्याची टिका करत रस्ते चांगले झाल्याची थाप मारली जात असताना केला. 


दुष्काळात चारा छावणी नाही : पवार 

दुष्काळ काय फक्त कागदावरच आहे काय? असा प्रश्न उपस्थित करून अजीत पवार यांनी राज्यात शासनाने चारा छावणी, चराईबंदी केलेली नाही. राेजगार हमी याेजनेची कामे ठप्प आहे. केंद्रीय पथकाने दुष्काळाची पाहणी नावालाच केली. पथक जाऊन दाेन महिने झाले तरी दुष्काळावर उपाय नाही. राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची दाेन लाख पदे रिक्त असताना फक्त ६० हजार पदांची भरती सुरू आहे. त्यामुळे राेजगाराची संधी प्रत्येक बेराेजगारास मिळणार नसल्याचे सांगितले. 


पराभव दिसताच आरक्षण; जयंत पाटील यांनी केली टीका 
सभेच्या ठिकाणी स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र माेदीच्या भाषणांची रेकार्डींग दाखविण्यात येऊन माेदींनी अशा प्रकारे खाेटे आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली असल्याची टिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पराभव दिसताच शासन सवर्णांना १० टक्के आरक्षण, नाेकर भरतीसारखे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी युती सरकारचे काही निर्णय खाेडून काढले. सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, रामचंद्र जाधव यांनी केले. 


उशिरा आलेल्यांचे सत्कार; पवारांची तंबी 

सभा सुरू झाल्यानंतर माजी मंत्री फाैजीया खान तसेच इतर प्रमुख पदाधिकारी तासाभराने दाखल झाले. त्यांचा सत्कार करण्याची सूचना सुत्रसंचालकाने करताच उशिरा आलेल्यांचे सत्कार बंद करावे, अशी तंबी अजीत पवारांनी दिली. 


जळगाव लाेकसभा कन्फर्म, रावेरबाबत मात्र अद्यापही माैन 
लाेकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघातून इच्छूक असलेले अनिल भाईदास पाटील, अॅड.वसंतराव माेरे, प्रमाेद पांडुरंग पाटील हे तिघेही व्यासपीठावर असताना अजित पवार यांनी या सभेत लाेकसभेसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याेग्य उमेदवार देतील, असे सांगून जळगावची जागा राष्ट्रवादीसाठी जवळपास सुटली असल्याची माहिती दिली. रावेर लाेकसभेबद्दल त्यांनी काहीही भाष्य केले नाही. 


केंद्रासह राज्यात परिवर्तनाची लाट: धनंजय मुंडे 
राज्य अन् केंद्रात परिवर्तनाची लाट असल्याची टिका करताना धनंजय मुंडे म्हणाले की, माेदींच्या काळात व्यापम, राफेलसारखे घाेटाळे झाले. बुलेट ट्रेनसाठी २५ हजार काेटी रूपये खर्च केंद्र व राज्य शासन करतय.आणि शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीची साडेचार वर्ष प्रतीक्षा करावी लागली.त्यातही ८० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. निवडणूक आली की भाजपाला रामाची आठवण हाेत असते. अच्छे दिनचे स्वप्न चक्काचुर झाले असल्याचे मुंडे यांनी सांगितले. 


जळगाव, धुळे महापालिका निवडणुकीसंदर्भात टीका 
जळगाव, धुळे, नाशिक महापालिका निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देताना अजित पवार यांनी पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा हे असा खेळ सरकारचा सुरू असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी प्रत्यक्षपणे गिरीश महाजन किंवा अन्य कुणाचेही नाव घेणे टाळले. जिल्ह्यातील भाजपचे दाेन दिग्गज नेते माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरश महाजन यांच्यावर अजित पवारांशिवाय अन्य नेत्यांनी टीका करण्याचे टाळले. 


वारे शासन शासन तेेरा खेल, न्याय मांगा हाे गई जेल : छगन भुजबळ 
महाराष्ट्र सदन घाेटाळ्याप्रकरणी अडीच वर्ष शिक्षा भाेगुन बाहेर आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपला राग व्यक्त केला. वारे शासन शासन तेेरा खेल, न्याय मांगा हाे गई जेल... असे आेळी म्हणताना त्यांनी महाराष्ट्र सदन बांधकामाचा खर्च व ठेकेदाराच्या पेमेंटबाबत राज्यातील समितीने निर्णय घेतला हाेता. या समितीत अनेक मंत्री अन् स्वत:अजीत पवारदेखील हाेते, याची आठवण करून देत आपल्या मनातील खल भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे बाेलून दाखविली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसाेबत माझा पंगा झालाय. त्यामुळे हे कुठे लागतात? अशी खाेचक टिका त्यांनी सरकारवर केली. भाजपाला आताकुठे आेबीसींची आठवण झाली असल्याचे सांगतांना भुजबळांनी शरद पवारांचे गुणगान गायले. 


सिंचनप्रकरणी पाटील यांची टीका; सूडाचे राजकारण 
जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमाेेद पाटील म्हणाले की, सिंचन घाेटाळ्यात अजित पवार यांचे नाव गाेवण्यात आले. ३० वर्षांपूर्वीच्या कामांना अजित पवार कसे दाेषी, असे सांगून त्यांनी भाजपा-सेना सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याची टिका केली. सर्वच पातळ्यांवर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...