आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या 'बेपत्ता' आमदारांची सुटका; अजित पवार एकाकी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भाजपसाेबत सत्तेत जाऊन शपथविधी असल्याची कल्पना न देता थेट दिल्लीजवळील गुडगावात आणलेल्या राष्ट्रवादीच्या ३ आमदारांची साेमवारी सुटका करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले. आमदार अनिल पाटील (अमळनेर), दौलत दरोडा (शहापूर) आणि नरहरी झिरवळ (दिंडोरी) हे तीन आमदारांसह आता पक्षाचे ५४ पैकी ५१ आमदार शरद पवारांच्या गाेटात दाखल झाले आहेत. आणखी दाेन आमदार प्रवासात असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अजित पवार आता एकटे पडले आहेत.

'आमची दिशाभूल करून दिल्लीत आणले हाेते. भाजपसाेबत सरकार स्थापनेला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, हे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले. मग, सुटकेसाठी आम्ही साहेबांना फोनवरून बोललो. काही चिंता करायची गरज नाही. काही कार्यकर्ते तुमची बाहेर पडण्याची व्यवस्था करतील', असा विश्वास साहेबांनी दिला. तिथे स्थानिक कार्यकते आले. त्यांनी आमची सुटका केली, असे आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांनी सांगितले. 'आपण मोठ्या साहेबांचे भक्त आहोत. केवळ राष्ट्रवादीच्या बळावर आमदार झालो आहोत. गावकऱ्यांनी पैसे जमवून मला निवडणुकीला उभे केले, त्यांना कसे फसवणार? मेल्यानंतर माझी हाडे काढली तरी ती शरद पवार म्हणतील', असे आमदार नरहरी झिरवळ म्हणाले.

शिवसेनेची महत्त्वाची भूमिका

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उदगीरचे राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई विमानतळावरून राष्ट्रवादीच्या गाेटात आणले होते. आता राष्ट्रवादीच्या तीन आमदारांची सुटका कारण्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते.

इतर दाेघेही संपर्कात

राष्ट्रवादीसोबत सध्या ५१ आमदार आहेत. धर्मराव अत्राम (अहेरी) हे गडचिरोलीत आहेत, तर अण्णा बनसोडे हे पिंपरीचे आमदार आजारी आहेत. त्यांच्याशी संपर्क झाल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

कार्यकर्तींना पाठवून आमदारांना आणले

भूषण महाले 

नाशिक : गुुडगावातील हाॅटेल अाेबेराॅयमध्ये डांबलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना बाहेर काढण्याचे काम माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नियाेजनातून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्तींनी केले. शरद पवार यांचे पीए शिंपी आधी याच हाॅटेलात जाऊन राहिले, मात्र संशय आल्याने पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्तींना पाठवण्यात आले. त्यांचा संशय आला नाही. त्यांनी बाबासाहेब पाटील यांना रविवारी रात्री बाहेर पडण्यास मदत केली. त्यानंतर पहाटे नितीन पवार, अनिल पाटील, दाैलत दराेडा यांना रवाना केले गेले. नरहरी झिरवळ यांना हाॅटेलच्या भुयारी मार्गाने बाहेर काढले व पवारांच्या दिल्लीतील बंगल्यात ठेवण्यात आले, नंतर शिवसेना खासदार हेमंत गाेडसे यांनी झिरवळ यांना वेशांतर करून मुंबईत आणले.