आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यातील मुलीच्या अत्याचार प्रकरणाची एसआयटी चाैकशी करा, राष्ट्रवादीचा माेर्चा खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जालना जिल्ह्यातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजून सामूहिक बलात्कार केला होता. एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी चुन्नाभट्टी पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढला. दरम्यान, राज्य महिला आयाेगानेही या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चाैकशीचे आदेश दिले आहेत. 


चेंबूर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा राष्ट्रवादीतर्फे माेर्चा काढण्यात अाला. यात शेकडाे मुुंबईकर महिला व पुरुष सहभागी झाले हाेते. 'होश में आओ होश में आओ फडणवीस सरकार होश मे आओ... बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो... फाशी द्या फाशी द्या बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या...' अशा घाेषणा या वेळी देण्यात अाल्या. दरम्यान, या प्रकरणाची एसआयटी चाैकशी करण्यात यावी. जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशाराही सुळेंनी दिला. दरम्यान, पीडित मुलीच्या भावासह पाेलिस महासंचालकांची भेटही सुप्रिया सुळे व नवाब मलिक यांनी घेतली. काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणाची सीआयडीकडून चाैकशी करावी, अशी मागणी केली. 


आराेपींवर खुनाचा गुन्हा दाखल करा 
या गुन्ह्यातील आराेपींचा शाेध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्यात यावी. तपासाचा अहवाल ३१ ऑगस्ट राेजी आपल्याला सादर करण्यात यावा. आराेपींवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश राज्य महिला आयाेगातर्फे चुनाभट्टी पाेलिस ठाण्याच्या पाेलिस निरीक्षकांना देण्यात आले. 
 

बातम्या आणखी आहेत...