आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आता दोन झेंडे; एक घड्याळाचा अन‌् दुसरा शिवरायांचा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी | शिवस्वराज्य यात्रेवर निघालेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस दाेन झेंडे झळकवणार असल्याची घाेषणा शुक्रवारी पाथरीत केली. ‘एक घड्याळाचे चिन्ह असलेला राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा, तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेला भगवा ध्वज, असे दाेन्ही झेंडे आता पक्ष कार्यकर्त्यांच्या हाती असतील,’ असे पवार म्हणाले.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पाथरीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पवार बोलत होते. या वेळी बाजार समितीच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्यात पवार यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर खा. डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. विजय भांबळे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी खा. सुरेश जाधव, राजेश विटेकर, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड आदींची उपस्थिती होती. 

पवार म्हणाले, बाजार समित्या चांगले काम करीत असताना हे शासन या संस्थेचे खासगीकरण करण्याचा घाट घालत आहे. मागील पाच वर्षांच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना रिक्तपदे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र ते शासनाकडून भरली जात नाहीत. दुसरीकडे महाजनादेश यात्रा काढण्याचे काम मात्र सरकार करीत आहे.  सरकारने दडपशाही चालवण्याने त्यांना पोलिस संरक्षणात महाजनादेश यात्रा काढण्याची वेळ आली, असा आरोप पवार यांनी केला. आर्थिक मंदीमुळे बंद पडत असलेल्या कंपन्यांमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नांवर शासनाने लक्ष घालावे. छत्रपतींच्या नावे भावनिक करण्याचे काम करू नये, असेही आवाहन पवार यांनी केले. विरोधी पक्षनेते मुंडे यांंनी युतीची यात्रा ही मुख्यमंत्री पदासाठीच असल्याचा आरोप केला. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे पूरपरिस्थितीत जनतेच्या संसाराची धूळधाण उडाली, असेही ते म्हणाले. खा. डॉ. कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा ही तरुणांसाठीच असल्याचे नमूद करत बेरोजगारांनी भावनेच्या आहारी न जाता आगामी काळात योग्य माणसांना निवडून द्यावे, असेही आवाहन केले. 

पाथरीवर राष्ट्रवादीचा दावा
पाथरी तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. गावपातळीवर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. या भागात आघाडी शासनाच्या काळात भरमसाठ निधी मिळाल्यामुळे बंधाऱ्याची कामे मार्गी लागली होती. त्याचे परिणाम दुष्काळी स्थितीत दिसून येत आहे. परंतु तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम या सरकारने पूर्ण न केल्याचा आरोप करीत जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे या मतदारसंघातील वर्चस्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडण्यात यावी, अशीही मागणी आ. बाबाजानी यांनी केली.

मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले
उद्घाटन सोहळ्यापूर्वी मानवत रोड ते पाथरी अशी ४०० मोटारसायकलची रॅली कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत काढण्यात आली. त्यामुळे मोठी वातावरण निर्मिती साधली गेली होती. 

बातम्या आणखी आहेत...