Home | Maharashtra | Pune | NCRA scientist found sun,s whole image

पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञांनी मिळवले सूर्याचे सखोल रेडिओ छायाचित्र‘स्पेस वेदर’ क्षेत्रातील महत्त्वाचे संशोधन

जयश्री बोकील | Update - Apr 16, 2019, 10:44 AM IST

हे नवे संशोधन एप्रिल महिन्याच्या अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे

  • NCRA scientist found sun,s whole image

    पुणे- आकाशातील सर्वाधिक तेजस्वी आणि पृथ्वीच्या अस्तित्वासाठीची अपरिहार्यता असणाऱ्या सूर्याची रेडिओ वेव्हलेंथवर सर्वात सखोल अशी प्रतिमा (इमेज) बनवण्याची कामगिरी भारतीय शास्त्रज्ञांच्या पथकाने केली आहे. पुण्यातील एनसीआरए (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स) या संशोधन संस्थेच्या संशोधकांनी केलेले सूर्याविषयीचे हे नवे संशोधन एप्रिल महिन्याच्या अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे.


    एनसीआरचे वरिष्ठ संशोधक डॉ. अतुल मोहन, डॉ. सुरजित मंडल, डॉ. दिव्या ओबेराय, रोहित शर्मा यांच्या पथकाने हे यश मिळवले आहे. त्यासाठी जीएमआरटीसह जगभरातील विविध रेडिओ टेलिस्कोपची निरीक्षणे, नोंदी आणि डाटा यांचा सातत्याने अभ्यास करून या पथकाने सूर्याची अनेक प्रकारची माहिती जमवली. त्यातून ‘एअरकर्स’ (ऑटोमेटेड इमेजिंग रुटीन फॉर कॉम्पॅक्ट अॅरिज फॉर द रेडिओ सन) या सॉफ्टवेअर पॅकेजची निर्मिती करण्यात आली. या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने सूर्याची अत्यंत सखोल अशी रेडिओ प्रतिमा मिळवण्यात भारतीय पथकाने यश मिळवले आहे. सूर्य अतिविशाल, महातेजस्वी तारा असल्याने आजवर सूर्यापर्यंत कुणीही पोहोचू शकलेले नाही. पृथ्वीवरील चुंबकीय आवरणामुळे सूर्याची प्रखरता कमी प्रमाणात पृथ्वीवर येते. ऊर्जेचे जसे रूपांतरण होते (विद्युतशक्ती दिसत नाही, पण तिचे रूपांतर केल्यावर ती प्रकट होते) तसेच प्रकाश, ध्वनीलहरी चर्मचक्षूंना दिसत नाहीत. त्या पाहण्यासाठी वेगळ्या प्रकारची सामग्री लागते. त्याचप्रमाणे सूर्याला जवळून पाहण्यासाठी रेडिओलहरींचा वापर या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आला, अशी माहिती एअरकर्स प्रकल्पाचे प्रमुख सुरजित मंडल यांनी दिली. अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार सूर्यावर सतत महाप्रचंड स्फोट होत असतात. त्यातून महाशक्तिमान ज्वाळा उफाळत असतात. हे सारे पृथ्वीपासून अति दूरवर घडत असले तरी अंतरिक्षात (वातावरणाच्या पलीकडे) या स्फोटांचे परिणाम जाणवतात, असेही सांगण्यात आले आहे.


    अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त
    मानवाने अंतरिक्षात सोडलेले वेगवेगळे उपग्रह, रॉकेट्स यांच्यावर या स्फोटांच्या कंपनलहरींचे परिणाम होतात. त्यामुळे उपग्रहांवर आधारलेली संपर्क यंत्रणा, दळणवळण, सॅटेलाइट्स, जीपीएस यांच्यावर परिणाम घडतो. त्यामुळे सूर्यावरील स्फोट, ज्वाळा, वादळे आणि सौरडाग यांची अधिकाधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात जगभरातील संशोधक असतात. भारतीय संशोधकांच्या पथकाने मिळवलेली सूर्याची अति सखोल रेडिओ इमेजवरील माहिती अनेक बाबींच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. एकूणच हे संशोधन आगामी पिढीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

Trending