आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी पथसंचलन, थरारक हवाई कवायतींनी पार पडला एनडीए दीक्षांत सोहळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) १३६ व्या तुकडीचा शिस्तबद्ध दीक्षांत संचलन सोहळा गुरुवारी खेत्रपाल परेड ग्राउंडवर दिमाखात पार पडला.

 

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलन आणि वायुदलाच्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या वेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सुखोई लढाऊ विमानांनी अधिकारी आणि उपस्थितांना दिलेली सलामी विशेष आकर्षण ठरले. 

 

संचलन सोहळ्यासाठी हवाईदलाचे प्रमुख एअर मार्शल बी. एस. धनोआ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी एनडीएचे कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपिन, दक्षिण मुख्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी, डेप्युटी कमांडंट रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला व अन्य अधिकारी उपस्थित होते. भारतीय उपखंडातील सुरक्षेची आव्हाने वाढत आहेत, त्याचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी केले.

 

भारताच्या २९१ सहभाग
या वर्षी २९१ कॅडेट्सनी प्रशिक्षण पूर्ण केले.  यात लष्कराचे २१८, नौदलाचे ३४ व हवाईदलाचे ३९ कॅड्ेटस होते. शिवाय अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका, व्हियतनाम, ताजिकिस्तान, मालदीव, पपुआ न्यू ज्युनिया या मित्रदेशांचे १५ कॅडेट्सही सहभागी होते. 
संदीप कोरंगा सुवर्णपदकाचा मानकरी, दिव्यमला रौप्य


यंदा उत्तराखंडमधील पिठारगड येथील संदीप कोरंगा हा राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. कानपूर येथील दिव्यम द्विवेदी हा राष्ट्रपती रौप्यपदकाचा मानकरी ठरला. राष्ट्रपती कांस्यपदक एस. के. एस चौहानने, तर “चीफ आॅफ स्टाफ बॅनर’वर चॅम्पियन किलो स्क्वाड्रनने नाव कोरले. 


आयएमएत प्रशिक्षण घेऊन इन्फंट्रीत जाणार
माझे वडील वकील, आई गृहिणी आहे. प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना नेहमीच स्वत:मधील क्षमतांची जाणीव होत होती. कॅम्प तोरणा सर्वाधिक आव्हानात्मक भाग होता. यापुढे आयएमएत प्रशिक्षण पूर्ण करून इनफ्रंट्रीमध्ये जाण्याचा मानस आहे. 
- संदीप कोरंगा, प्रेसिडेंट सुवर्णपदक विजेता 


एनडीएचा विद्यार्थी असलेल्या भावाने प्रेरित
प्रबोधिनीतील प्रशिक्षण  आव्हानासाठी सज्ज करते. माझा भाऊ १३२व्या तुकडीचा विद्यार्थी असून नौदलात कार्यरत आहेत. त्याच्यामुळेच मला प्रबोधिनीत येण्याची प्रेरणा मिळाली. मीदेखील पुढील प्रशिक्षण पूर्ण करून नौदलात दाखल होणार आहे. 
-दिव्यम द्विवेदी,रौप्यपदक विजेता 


वडील लष्करी अधिकारी, एनडीमुळे सर्वस्वी घडलो
लहानपणापासूनच वडिलांच्या लष्करी शिस्तबद्ध जीवनशैलीचा प्रभाव होता. सहावीनंतरच मला बंगळुरू सैनिकी शाळेत दाखल केले. त्यामुळे सैन्याच्या जीवनाबाबत माहिती होती. मात्र प्रबोधिनीतील प्रशिक्षण अपेक्षेपेक्षा थोडे जास्तच खडतर होते. मात्र त्यामुळेच खऱ्या अर्थाने घडलो.
- एस. के. चौहान, कांस्यपदक विजेता