आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनडीए खासदारांची आज दिल्लीत बैठक; अमित शहा यांना कॅबिनेट मंत्रिपद?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत आलेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या वेळी मंत्रिमंडळात अनेक नवे आणि तरुण चेहरे असतील. काही भाजप नेत्यांच्या मते भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही मंत्रिमंडळात असतील. त्यांना गृह, अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण यापैकी एखाद्या मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. शहा यांना याबाबत विचारले असता त्यांनी हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार असल्याचे सांगत भाष्य करण्यास नकार दिला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज नव्या मंत्रिमंडळात नसतील अशीही चर्चा सुरू आहे. नव्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी राहील, असे म्हटले जात आहे. अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी राहील. सध्याच्या मंत्रिमंडळातील राजनाथ सिंह, नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, नरेंद्रसिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर यासारख्या अनुभवी चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळू शकते. प. बंगाल, ओडिशा आणि तेलंगणात पक्षाला यश मिळवून देणाऱ्या खासदारांनाही पदे मिळण्याची शक्यता आहे.

 

एनडीए खासदारांची आज दिल्लीत बैठक

प्रचंड बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येत असलेल्या एनडीए खासदारांची शनिवारी बैठक होत आहे. यात नरेंद्र मोदी यांची पुन्हा नेतेपदी निवड होईल. ३० मे रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असे मानले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मंत्रिमंडळाने १६ वी लोकसभा भंग करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली.

 

काँग्रेसच्या दोन प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे :

काँग्रेस पक्षात राजीनामा सत्र सुरू झाले आहे. उ.प्र. प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी राजीनामा सादर केला. तर, कर्नाटकात एच. के. पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...