आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपनगरला जॉगिंग ट्रॅकजवळच शाळेला लागून 'फेरीवाला क्षेत्र'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पूर्व विभागात महापालिकेकडून निश्चित करण्यात आलेल्या १५ फेरीवाला क्षेत्रामधील दोन क्षेत्र हे जॉगिंग ट्रॅकवर तयार करण्यात आल्याने त्याचा त्रास जॉगर्सला होत आहे.

 

साईनाथनगरच्या जॉगींग ट्रॅकनंतर उपनगर जॉगिंग ट्रॅकजवळील फेरीवाला क्षेत्र जॉगर्सना अडचणीचे ठरत आहे. या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जुन्या नाशकातील गुमशाह बाबा चौकात थेट शाळेला लागून तर डीजीपीनगर परिसरातील कॅनाॅललगत क्षेत्र तयार करण्यात आल्याने त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे.

 

पूर्व विभागातील काही भागांतील फेरीवाला क्षेत्रामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होणार आहे. शहरात महापालिकेच्या वतीने फेरीवाला, ना फेरीवाला प्रतिबंधित क्षेत्राची निर्मिती करण्यात अाली अाहे. महापालिकेकडून शाळा, नदीकाठी शौचालये व वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या भागात फेरीवाला झोन निश्चित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या पूर्व विभागातील उपनगर येथील जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर चक्क फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून त्याचा विरोध केला जात आहे. ही जागा केवळ जॉगिंग ट्रॅकसाठीच ठेवावी, अशी मागणी वारंवार स्थानिकांकडून करण्यात आलेली असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात अनेक नवीन रहिवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. उपनगरमधील लोकवस्तीही वाढली आहे. त्यांना सायंकाळी व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी जागा राहिलेली नाही. आंबेडकरनगरसमोरील डीजीपीनगर दोन, उपनगर इच्छामणी आणि आर्टिलरी सेंटररोड येथे जॉगिंग ट्रॅक आहेत, हा विचार करूनच प्रशासनाने उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकच्या जागी फेरीवाला क्षेत्र तयार केले. उपनगर नाका येथे जॉगिंग ट्रॅकचा वापर सहा वर्षांपासून नागरिक करीत नव्हते. त्यामुळे फेरीवाला झोनसाठी ही जागा वापरण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली अाहे. मात्र, या झोनला स्थानिकांकडून विरोधच असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर पूर्व विभागातील १५ क्षेत्रांमधील जुन्या नाशकातील गुमशाह बाबा चौकातील शाळा, अशोका शाळेजवळ असलेले फेरीवाला क्षेत्रही अडचणीचे ठरत आहे. या क्षेत्रांमुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडणार आहे. त्यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

 

उपनगर जॉगिंग ट्रॅकवर ३५ व्यावसायिकांना जागा
उपनगरच्या जॉगिंग ट्रॅकमध्ये फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ३५ व्यावसायिकांना जागा देण्यात आली आहे. ही जागा जॉगिंग ट्रॅकसाठी राखीव असताना या ठिकाणी फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

 

पूर्व विभागातील फेरीवाला क्षेत्र
महात्मा फुले मार्केट, शिवनेरी चौक, तिगरानिया रोड, जाउद्दीन मिल (चौकमंडई), गुमशाह बाबा चौक (शाळेलगत), डीजीपीनगर कॅनाॅललगत, उपनगर जॉगिंग ट्रॅक, साईनाथनगर चौक, इंदिरानगर उपकार्यालयाजवळ, कृष्णकांत भोगे मार्केट, भारतनगर, शिवाजीनगर, दत्तमंदिर

 

बातम्या आणखी आहेत...