गणोशोत्सव / महाकाय महाधिपती : पुण्याजवळ सह्याद्रीच्या डोगररांगांत विशाल १ हजार टन वजनी मूर्ती, तांब्याचा मुलामा

उंची, लांबी-रुंदीची बेरीज होते नऊ

मंगेश फल्ले

Sep 02,2019 08:45:00 AM IST

पुणे - जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत साेमाटणे फाटा येथे सह्याद्रीच्या डाेंगररांगांत सरला बसंतकुमार बिर्ला यांच्या संकल्पनेतून ७२ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती साकारण्यात अाली आहे. तिचे वजन १ हजार टन असून ती जगातील सर्वाधिक वजन असलेली गणेशमूर्ती म्हणून ओळखली जाते. सिमेंट काँक्रीट, स्टील, तांबे वापरत मूर्ती उभारण्यासाठी अडीच वर्षे लागली. जानेवारी २००९ मध्ये प्रतिष्ठापना झाली. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून एकूण १७९ पायऱ्या चढून जावे लागते. दर ४ वर्षांनी मूर्तीवर तांब्याचा लेप लावून तिला नवी झळाळी देण्यात येते.

सकल गुण आणि गणांचा अधिपती श्रीगणेशाचे आज मोठ्या थाटात आगमन होत आहे. हा आहे पुण्याजवळ, सह्याद्रीच्या डोंगररांगांत आणि निसर्गाच्या कुशीत विराजमान असलेला बिर्ला गणेश. ७२ फूट उंच आणि जगातील सर्वाधिक एक हजार टन वजन असलेल्या या गणेशमूर्तीचे खास ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी आमचे छायाचित्रकार अशोक गवळी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले विहंगम छायाचित्र.

कसे जायचे

पुण्यापासून ३० किमी लोणावळ्याच्या दिशेने, जुन्या पुणे-मुंबई हायवेवर. सोमाटणे फाटा, तळेगाव टोल नाक्याजवळ.

उंची, लांबी-रुंदीची बेरीज होते नऊ

उंची, लांबी, रुंदीची बेरीज ‘९’ येईल, अशा पद्धतीने मूर्ती उभारली आहे. जवळ ‘ॐ गं गणपतये नम:’ हा बीजमंत्र काेरण्यात आलेला असून त्याची बेरीजही ‘९’ आहे.

७२ फूट उंची (७+२ = ९)
१८ फूट उंच ओटा (१+८ = ९)

४५ फूट लांब ओटा
(४+५ = ९)
५४ फूट रुंद ओटा
(५+४ = ९)

१६ एकर परिसर

अशी करा श्री गणेशाची प्रतिष्ठापना

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट, सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांची डहाळी, सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ.


मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून अक्षता पसराव्यात. नंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शुचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायामादी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावे. कलश, शंख, घंटा व दीप यांना गंध-अक्षता-पुष्प अर्पण करावे. नंतर गणपतीच्या नेत्रांना दूर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.


अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।


अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्रीगणेशाला नमस्कार करून श्रीगणेश मूर्तीचे ध्यान करावे.


आवाहयामि विघ्नेश सुरराज आर्चितेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।। ६ ।।
श्री पार्थिव गणेशाय नम:। आवाहयामि।।


असे म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. श्रीगणेशाच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.
पळीभर पाण्यात गंध, अक्षता, पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने अर्घ्य म्हणून श्रीगणेशाला अर्पण करावे. त्यानंतर क्रमाने श्रीगणेशाच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे. फुलाने पाणी शिंपडावे. फुलाने पंचामृत अर्पण करावे. नंतर पाणी अर्पण करावे. यानंतर फुलाने किंचित पाणी शिंपडत अथर्वशीर्ष म्हणावे. यानंतर श्रीगणेशाला वस्त्र अर्पण करावे. जानवे श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे. श्रीगणेशाच्या मस्तकाला चंदन लावावे, अक्षता अर्पण कराव्यात.


माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।
मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।। १७ ।।
श्री पार्थिव गणेशायय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।

असे म्हणून अनेक प्रकारची फुले, दूर्वा, शमी व अन्य पत्री श्रीगणेशाला अर्पण कराव्यात.
डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशाला ओवाळावे, निरांजनाने ओवाळावे, नैवेद्य दाखवावा, विडा अर्पण करावा. २१ दूर्वा अर्पण कराव्यात. श्रीगणेशासमोर साष्टांग नमस्कार घालावा. आरती करावी.


यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।
तानि तानि विनश्यन्तिम् प्रदक्षिण पदे पदे।। २५ ।।

असा मंत्र म्हणून स्वत:भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्यात. मंत्रपुष्पांजली अर्पण करावी.श्रीगणेशाला हात जोडून पुढील प्रार्थना करावी...


आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।
पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।
मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तिहीनम् सुरेश्वर।
यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।
अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।
तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।
श्रीगणेशाला साष्टांग नमस्कार घालावा.
।। इति पूजाविधी ।।

X
COMMENT