विधानसभा 2019 / राज्यात एकूण 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंदणी, मतदान केंद्रांवर व्हीलचेअरसह विशेष सुविधा

फाइल फोटो फाइल फोटो

राज्यात जवळपास 4 लाख दिव्यांग मतदार, पुण्यात सर्वाधिक 67 हजार

प्रतिनिधी

Oct 08,2019 07:40:00 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. पुणे जिल्ह्यात 67 हजार 279 दिव्यांगांची नोंद झाली असून, ती राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात 24 हजार 197 व सांगलीमध्ये 21 हजार 742 जणांनी दिव्यांग म्हणून नोंदणी केली आहे. सर्वात कमी 2329 जणांनी हिंगोली जिल्ह्यात दिव्यांग असल्याची नोंद केली आहे.


दिव्यांगांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा करण्यात येणार आहे. दिव्यांगाना केंद्रापर्यंत सुलभपणे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात येतील. दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावे,यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यंदाचे वर्ष हे सुलभ निवडणूक (ॲक्सेसेबल इलेक्शन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. पीडब्ल्यूडी ॲपद्वारे दिव्यांगांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

X
फाइल फोटोफाइल फोटो