आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १७ ओळखपत्रांपैकी हवा एक पुरावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी त्यांच्या जवळच्या १७ ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा आणणे बंधनकारक आहे, तरच त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यामुळे एखाद्या मतदाराकडे भारत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले तरी त्याला स्वतःच्या ओळखीचा दुसरा पुरावा देऊन मतदान करता येणार आहे. मतदान केंद्राच्या आवारात मोबाइल व आजी-आजोबांसोबत येणाऱ्या नातवंडांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

 

महापालिका निवडणुकीसाठी नऊ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात मोबाइल बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान करण्यास येताना मोबाइल फोन, तसेच इतर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आणू नये, असे निर्देश प्रशासनाने दिलेले आहेत. मतदान केंद्रावर मतदाराला त्याच्या स्वतःच्या ओळखीबाबत १७ ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करता येईल, असे सांगण्यात आले. 

 

मतदानाचा दिवस अवघ्या चार दिवसांवर आल्याने प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी वेळोवेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत. महापालिका निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. मतदान केंद्रात मतदार व उमेदवारांचे प्रतिनिधींना मोबाइल फोन आणि इतर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास बंदी आहे. 

 

आपल्या आजी-आजोबांना डोळ्याने कमी दिसते, आजोबांना चालता येत नाही, बटण दाबताना बोट थरथरते, अशी कारणे सांगणारी काही नातवंडे मतदान कक्षात येतात. पण, आता आजी-आजोबांना घेऊन जाणाऱ्या अशा नातवंडांना यावेळी मतदान कक्षामध्ये प्रवेश नसणार आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या झालेल्या प्रशिक्षणामध्येही याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

 

आमिषाला बळी पडू नका 
मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांनी कुठल्याही अमिषाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. मतदान करण्यासाठी कोणतीही व्यक्ती अामिष किंवा प्रलोभन दाखवत असल्यास आचारसंहिता कक्ष प्रमुख उपजिल्हाधिकारी संदीप निचीत किवा उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार करावी. प्रलोभनाशिवाय प्रामाणिकपणे मतदान करावे. राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी. 

 

मतदानासाठी यापैकी हवे एक ओळखपत्र 
निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट, शासकीय नोकरदाराचे ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबूक, पॅनकार्ड, जनगणना (एनपीआर) स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेली पेन्शन कागदपत्रे, आधार कार्ड, पदवी, पदविका प्रमाणपत्र, ३१ मे २०१८ पूर्वीचे फोटोसह असणारे रेशनकार्ड, ३१ मे २०१८ पूर्वीचे फोटोसह असणारे जात प्रमाणपत्र, ३१ मे २०१८ पूर्वीचे फोटोसह असणारे अपंग प्रमाणपत्र, मालमत्तेबाबतची कागदपत्रे किंवा नोंदणीकृत दस्त, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बँक पासबुक, रोजगार हमी योजनेचे देण्यात आलेले फोटोसहित ओळखपत्र, शस्त्र परवाना. 

 

चार रंगांची मतपत्रिका 
शहरात १७ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात ४ असे एकूण ६८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक मतदाराला त्याच्या प्रभागात अ, ब, क आणि ड असे प्रत्येकी १ मत याप्रमाणे ४ मते देण्याचा अधिकार आहे. अ, ब, क आणि ड या वर्गवारीप्रमाणेच बॅलेट युनिटवर ४ रंगाच्या मतपत्रिका असतील. अ - साठी पांढऱ्या रंगाची, ब साठी गुलाबी रंगाची, क साठी पिवळा, ड - साठी निळ्या रंगाची मतपत्रिका आहे, असे सांगण्यात आले. 

 

३३७ मतदान केंद्रे 
शहरातील १७ प्रभागांतील प्रत्येकी ४ याप्रमाणे ६८ जागांसाठी ३३७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४१ संवेदनशील आहेत. आपले नाव ज्या प्रभागाच्या मतदानयादीत आहे, त्या प्रभागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कडून यादीतील अनुक्रमांक तत्काळ उपलब्ध करण्यासाठी बीएलआंेनी संबंधित मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी उपस्थित राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

 

...तर नोटाचा पर्याय 
प्रत्येक मतदाराला त्याच्या प्रभागात 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' असे प्रत्येकी १ मत याप्रमाणे एकूण ४ मते देण्याचा अधिकार आहे. मात्र, मतदाराला निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्यास 'नोटा'चा पर्याय उपलब्ध केलेला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 
 

बातम्या आणखी आहेत...