Home | Maharashtra | Vidarva | Akola | need for collective efforts for development of higher education

उच्च शिक्षणाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता; माजी कुलगुरु डॉ. हरिभाऊ केदार यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 12:45 PM IST

उच्चशिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी समृद्ध, सक्षम, सर्वज्ञानी विद्यार्थी घडण्यासाठी

 • need for collective efforts for development of higher education

  कारंजा (लाड)- उच्चशिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी समृद्ध, सक्षम, सर्वज्ञानी विद्यार्थी घडण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. हरिभाऊ केदार यांनी केले. स्वातंत्र्य सैनिक श्री कन्हैयालालजी रामचंद्र इन्नानी महाविद्यालयात 'उच्चशिक्षण आणि आव्हाने' या विषयावर प्रथम कुलगुरु डॉ. के. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना डॉ. केदार बोलत होते.


  देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झालीत. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी विद्यापीठांची संख्या २० व महाविद्यालयांची संख्या ४९६ होती. आज ८६४ विद्यापीठे व ४० हजार महाविद्यालये या देशात आहेत, असे असले तरी १२५ कोटी जनतेसाठी ते पुरेसे आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जागतिक विद्यापीठांशी तुलना करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु येथील विद्यापीठांच्या स्थितीचा विचार आधी व्हायला हवा. भारतात जीईआर सध्या २५.२ टक्के आहे, तर चीनमध्ये ४४ टक्के, अमेरिकेत ८५ टक्के आहे. भारताचा २५.२ टक्के असलेला जीईआर ३० टक्के पर्यंत नेण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. उच्च शिक्षणात भारत आजही मागे आहे. त्यासाठी कमकुवत आर्थिक स्थिती, जीडीपीच्या ६ टक्के ऐवजी ३.७ टक्के खर्च, प्रशासकीय दिरंगाई, प्राध्यापकांमध्ये अधिक क्षमता व समर्पणाचा अभाव, केवळ नोकरीतील बढतीसाठी पीएचडी, कालबाह्य अभ्यासक्रम, परीक्षाकेंद्रीत विद्यापीठाची प्रणाली, उच्चशिक्षण संस्थांमधील समन्वयाचा अभाव आदी घटक जबाबदार आहेत. विद्यार्थी वर्गातील उपस्थिती दिवसेंदिवस कमी होताना दिसते, त्यासाठी प्राध्यापकांनी आपला विषय रोचक करावा, असे आवाहन केदार यांनी केले. दर दहा वर्षांनी ज्ञान दुप्पट होते. कौशल्य विकास, मूल्य विकास हे एक आव्हान आहे. शिक्षकांचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी कमी पडत आहे. मुक्त विद्यापीठांची निर्मिती महत्वाची झाली आहे. मानवी विकासाचे महत्वपूर्ण नियमन विद्यापीठांद्वारे होत असल्याने राष्ट्रीय स्तरावर थिंकटँक असावा आणि विद्यार्थ्यांनी स्वत:शीच स्पर्धा करावी, असेही ते म्हणाले. या वेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, दानदाते डॉ. श्रीमती कमलताई देशमुख, विद्याभारती शैक्षणिक प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत, पुरुषोत्तम इखार, सौ. इखार, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते. यावेळी दर्पण वार्षिकांक, श्री इखार लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. माजी प्र-कुलगुरु डॉ.व्ही. एस. जामोदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले. संचालन करीत आभार डॉ. अनुप नांदगांवकर यांनी मानले. व्याख्यानाला डॉ. केदार, महाविद्यालय व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक व विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.


  पुस्तक दालनाचे केले उद््घाटन
  कार्यक्रमाच्यापूर्वी कुलगुरुंचे हस्ते डॉ.व्ही. एस. जामोदे यांनी महाविद्यालयाला दिलेल्या पुस्तक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालय परिसरात कुलगुरुंचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विविध विभागांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी कुलगुरुंनी संवाद साधला व महाविद्यालयाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्राचार्य डॉ.पी.आर. राजपूत व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.


  विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करा: डॉ. चांदेकर
  अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी उच्चशिक्षणामध्ये अनेक आव्हाने असल्याचे सांगितले. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांकडे प्रवेश घेण्यासाठीसुद्धा पैसे नसतात. विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषत: ग्रामीण भागातील मुलींसाठी विद्यापीठाने अनेक उपयुक्त योजना सुरु केल्या आहेत. मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. जागतिक रँकिंगमध्ये असलेली विद्यापीठे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देतय काय? असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला. खूप योजना आहेत, त्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आपला मार्इंडसेट बदलायला हवा. विद्यार्थ्यांना कौशल्य द्या, संशोधनासाठी प्रोत्साहित करा आणि त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवा, असे आवाहनही त्यांनी केले.

Trending