आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलेपणाची गरज!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे २१ वर्षापूर्वी एकमेव उर्दू विद्यापीठ माैलाना अाजाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीची स्थापना जेव्हा हैदराबाद येथे करण्यात अाली, त्यावेळी त्याचा हेतू केवळ उर्दू भाषेचा विकास अाणि उन्नयन इतकाच मर्यादित नव्हता, तांत्रिक अाणि व्यावसायिक शिक्षण देखील उर्दूतून देणे हा देखील हाेता. अातापर्यंत काेट्यवधी रूपये खर्च झाले तेव्हा अाता लक्षात अाले की, या विद्यापीठातील निम्म्यापेक्षाही अधिक शिक्षक स्वत: या भाषेतून शिकवू शकत नाहीत. कुलगुरूंनी स्वत:च या बाबीची कबुली दिली अाहे. सारे अभ्यासक्रम अाजदेखील इंग्रजीतूनच शिकवले जातात अाणि अातापर्यंत केवळ ५० पुस्तकांचे उर्दूत भाषांतर झाले अाहे. परंतु ते देखील बाहेरील लाेकांकडून करवून घेतले अाहे. कुलगुरू म्हणतात, 'या कामासाठी विद्यापीठातील एकही शिक्षक सक्षम नाही'. शिक्षकांची नियुक्ती करणाऱ्या तज्ञांचे म्हणणे असे की, जाेपर्यंत शिफारशींच्या अाधारावर नेमणुका हाेत राहतील ताेवर असेच शिक्षक मिळणार. याशिवाय राजस्थानच्या जयपूरमधील सरकारी संस्कृत विद्यालयात ८०% मुस्लिम विद्यार्थी अाहेत. ते वेदातील ऋचा, गीतेचे श्लाेक स्पष्ट शब्दाेच्चारासह म्हणतात अाणि अस्खलित लिहितात. अनेक श्लाेक अाणि संपूर्ण हनुमान चालिसा त्यांना मुखाेद्गत अाहे. स्वत:ची अाेळख ते संस्कृतमधून करवून देतात. खरे तर ही मुले गरीब कुटूंबातील अाहेत. परंतु शाळा सुटल्यानंतर लहान-माेठी कामे करून घरची काैटुंबिक स्थिती सुधारण्यास हातभार लावतात अाणि रात्री मदरशात अरबी अाणि कुरअान शिकतात, वाचतात. मुख्याध्यापिकेने दिलेल्या माहितीनुसार या मुलांना हिंदी, संस्कृत, अरबी अाणि उर्दू या चार भाषा सहज अवगत अाहेत. हिंदू मुलांच्या तुलनेत मुस्लिम विद्यार्थ्यांचा गुणानुक्रम अधिक चांगला अाहे. हे सांगण्याचे कारण असे की, बनारस हिंदू विद्यापीठातील संस्कृत विद्या धर्म-विज्ञान शाखेतील नियुक्त प्राेफेसर फिराेज खान यांच्या विराेधात विद्यार्थ्यांनी धरणे अांदाेलन पुकारले. १२ दिवसांपासून अध्यापन-अध्ययन ठप्प अाहे. मुस्लिम शिक्षक अाम्हास अामच्या धर्माची शिकवण देऊ शकत नाही. कुलगुरूंच्या मते एकूण २९ उमेदवारांपैकी निवड समितीला फिराेज हेच याेग्य शिक्षक वाटले अाणि विद्यापीठाच्या कायद्यात धर्माच्या अाधारावर शिक्षक नियुक्त करण्याचा काेणताही नियम नाही. काश्मीर विद्यापीठातील डाॅ. मेराज अहमद खान यांचे मत विचारात घेतले पाहिजे. ते म्हणतात, अाज विद्यापीठात माॅडर्न संस्कृत शिकवले जाते, ज्याचा धर्माच्या कर्मकांडांशी संबंध नसताे. ती भाषा आहे. संस्कृत ही संपन्न भाषा अाहे, तिचा वारसा खूप माेठा अाहे. भाषेला धर्माशी जोडता कामा नये. मुळात अशा गोष्टींमुळेच संस्कृतची स्थिती आज बिकट आहे. भाषा बंदिस्त होते, तेव्हा ती संपते. खुली आणि सदैव परिवर्तनास तयार असणारी भाषा जग जिंकते, हे इंग्रजीने सिद्ध केले आहे. विद्यापीठात अशी कूपमंडूक वृत्ती दिसणे धोक्याचे आहे.