आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सोने तस्करीप्रकरणी संशयाची सुई दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अबुधाबीहून आलेले तस्करीचे ३ किलो सोने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कडेकोट संरक्षणातून औरंगाबादपर्यंत आलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात असून देशांतर्गत तपास यंत्रणा  गाफील राहिली की विमानतळावरील अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे,  या दृष्टीने केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने तपास सुरू केला आहे.  चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी रात्री सीमा शुल्क विभाग, केंद्रीय महसूल अन्वेषण संचालनालय (डीआरअाय ) आणि  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) संयुक्तपणे कारवाई करीत तस्करीचे तीन किलो सोने जप्त केले होते. याप्रकरणी    शेख फय्युम आणि शेख जावेद इस्माईल (रा. मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले होते. चोवीस तासांच्या चौकशीनंतर बुधवारी  जामिनावर मुक्तता करण्यात आली.   


एअर इंडियाच्या दिल्ली-औरंगाबाद विमानातून सोन्याची तस्करी करणाऱ्या शेख फय्युम आणि शेख जावेद इस्माईल या दोन  तस्करांना  केंद्रीय   महसूल अन्वेषण संचालनालयाच्या (डीआरआय)  पुणे येथील अधिकाऱ्यांनी सीमाशुल्क विभागाच्या मदतीने मंगळवारी   रात्री साडेआठ वाजता औरंगाबाद विमानतळावर सापळा रचून शिताफीने अटक केली होती.  केंद्रीय सीमा शुल्क कायदा कलम १९६२ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. या आरोपींकडून विदेशी बनावटीचे तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते. या सोन्याच्या बिस्किटांचे १२ तुकडे करून ते हँडबॅगमध्ये लपवण्यात आले होते. एक किलाे वजनाच्या सोन्याचे प्रत्येकी चार  याप्रमाणे तस्करांनी १२ तुकडे केले होते.  


सीटखालील पाइपमधून सोने भारतात: फय्युम आणि जावेद हे तस्कर एअर इंडियाच्या विमानातून अबुधाबीहून मुंबईत जाण्यासाठी बसले होते. विमानात बसल्यानंतर सीटखालील पोकळ पाइपमध्ये  त्यांनी हे सोने लपवले होते. मुंबईत उतरण्यापूर्वी एका हँडबॅगमध्ये सोने भरले होते. मुंबई येथून हे तस्कर विमानाने औरंगाबादला रवाना झाले. औरंगाबादला जाणाऱ्या विमानातून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून समजली होती. ‘डीआरआय’चे अधिकारीही मुंबईहून या विमानात बसले. 

 

मात्र त्याची खातरजमा करण्यास वेळ लागला तसेच औरंगाबादला हे सोने कुठे जाणार आहे, याचा तपासही या टीमला करावयाचा होता. त्यामुळे या कारवाईचे शेवटचे स्थळ औरंगाबाद ठरले होते. औरंगाबाद येथे विमान आल्यानंतर दोघे तस्कर खाली उतरताच झडप घालून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

 
पुण्यात झाली कसून चौकशी ..  
औरंगाबाद विमानतळावर रात्री ८.३० ते उत्तररात्री १ वाजेपर्यंत पंचनामा करून सोने जप्त केल्यानंतर आरोपींना तत्काळ खासगी गाडीने पुणे येथील ‘डीआरआय’च्या मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सोन्याची अबुधाबी येथून तस्करी केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची मुक्तता करण्यात आली. तस्करांकडून जप्त केलेले सोने सरकारदप्तरी जमा केले जाणार असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे ‘डीआरआय’च्या सूत्रांनी सांगितले.

 
सीमा शुल्क विभागाचे म्हणणे....  
अबुधाबीहून ३ किलो तस्करीचे सोने घेऊन दोन जण एअर इंडियाच्या विमानात बसल्याची खबर दिल्ली विमानतळावर कळली होती. त्यानंतर या दोघांचा पाठलाग सुरू झाला. हे सोने अखेर कुठे जाणार, त्याचा खरेदीदार कोण, याचा शोध घेण्यासाठी मुंबई विमानतळावरून दोन अधिकारी विमानात बसले होते. विमान पावणेआठच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावर येताच या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांकडून तीन किलो सोने जप्त करण्यात आले. 


मात्र सोने तस्करीचा एंड पाॅइंट शोधण्यासाठी हा पाठलाग करण्यात आला, असा दावा औरंगाबादच्या  सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केला. या कारवाईप्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली नव्हती.  

 

सोने मागवणारे गोत्यात
औरंगाबाद विमानतळावर सोने तस्करी उघडकीस येण्याची ही आजवरची पहिलीच घटना आहे. या तस्करांकडून औरंगाबादेत सोने मागवणारे आता सीमा शुल्क विभागाच्या रडारवर आले आहेत. तस्करीचे मोठे रॅकेट यामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.  

 

डीआरआयची पुण्यात स्थापन होताच पहिली कारवाई..  
सोन्या-चांदीच्या वाहतुकीवर जीएसटी लागू नाही, मात्र सीमा शुल्क लागू आहे. तसेच सोने आणताना त्यांची नोंदणी करावी लागते. किती किलो आणले यापेक्षा त्याची किंमत काय यावर कर ठरतो. पण विमानातून सोने आणताना कोणतीही सूचना नसेल तर तस्करी समजली जाते. ही तस्करी आंतरराष्ट्रीय आहे. आजवर अशी कारवाई महाराष्ट्रात झालेली नाही. कारण डीआरआय हे कार्यालय पुण्यात  अस्तित्वात नव्हते. ते नुकतेच पुण्यात तयार झाल्यानंतरची ही पहिलीच कारवाई आहे.  

 

२ ते ५ वर्षे होऊ शकते शिक्षा..  
औरंगाबाद सीमा शुल्क विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, या केसमध्ये आमची भूमिका फक्त सहकार्याचीच होती. या कारवाईची मोडस ऑपरेंडी पुणे येथील डीआरआयच्या कार्यालयालाच माहीत होती. या प्रकरणात आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाते. पण पुढे अनेक दिवस खटला चालतो. यात २ ते ५ वर्षे शिक्षेची तरतूद आहे.  

 

‘दिव्य मराठी’चे प्रश्न ?  : दिल्ली विमानतळावरून तस्कर सुटले कसे?  
एवढे मोठे सोने तस्कर नेत असताना दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे सोने का तपासले गेले नाही ? हे दोन तस्कर अबुधाबीहून आलेले असताना देशांतर्गत तपास यंत्रणा गाफील कशी राहिली ? यात विमानतळावरील अधिकाऱ्याचा सहभाग आहे का? मात्र  सीमा शुल्कच्या दाव्याप्रमाणे सोने तस्कर आणि त्याचा एंड पॉइंट शोधायचा असताना चिकलठाणा विमानतळावरच दोघांना का पकडण्यात आले ?  दोन तस्कर शहरात कुणाला सोने देणार होते याचा शेवटपर्यंत शोध का घेण्यात आला नाही ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...