आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Neelambari Joshi Writes About Take Case During Using A Dating App, Matrimony Sites

डेटिंग अॅप, मॅट्रिमोनी साइट्स वापरताय?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नीलांबरी जोशी

स्त्रियांना फसवलं जाण्याची पद्धत साधारणपणे सारखीच असते. एकदा ऑनलाइन संपर्क झाल्यावर तीच व्यक्ती दुसऱ्या माध्यमावर फेक अकाउंट घेते. लग्नाची किंवा डेटिंगची वचनं दिली जातात. मग बहुधा हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे, या कारणानं आर्थिक मदत मागितली जाते. एकदा पैसे भरल्यानंतर समोरचा गायब होतो. बदनामीच्या भीतीनं अशा कित्येक घटनांच्या तक्रारीही महिला नोंदवत नाहीत.
जोडीदार निवडतानाची  संवेदनशीलता, नातेवाइकांची जोडीदार शोधण्यासाठी चाललेली भुणभुण, मित्रमैत्रिणींची होत असलेली लग्नं किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, काही मित्रमैत्रिणींचे सततचे ब्रेकअप्स, स्वत:ची पुरेशी न बसलेली आर्थिक घडी, .. हजार प्रकारचं काहूर मनात दाटत असतं. आपला जोडीदार कसा असावा याबद्दलचे काही जणांचे निर्णय पक्के असतात, तर काही जणांचे सतत बदलत असतात. भारतात लग्न एक तर अॅरेंज्ड पद्धतीत किंवा प्रेमविवाह या मार्गानं होतं. या दोन्ही बाबतीत अॉनलाइन विवाहसंस्था, डेटिंग वेबसाइट्स आणि अॅप्स आणि समाजमाध्यमं या तीन डिजिटल माध्यमांचा वापर सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात केला जातो. “ओकेक्युपिड” या डेटिंग वेबसाइटनं लग्न या विषयावर काय वाटतं ते जाणून घ्यायला २५ ते ३५ या वयोगटातल्या  ८६००० तरुण/तरुणींचं एक सर्वेक्षण केलं. त्यातल्या  ६८ टक्के जणांना लग्न करायला हवंच अशी गरज वाटत नव्हती. तसंच यातल्या ९८ टक्के तरुणी आणि ९० टक्के तरुणांना आपल्या पालकांपेक्षा आपली मूल्यं वेगळी असल्याचं मान्य केलं होतं. तसंच आपल्यासाठी जोडीदाराची निवड दुसऱ्या कोणीतरी करावी हा मार्गही मिलेनियल पिढीला मुळात मान्य नाही. आपण आयुष्यात कुठे उभे आहोत आणि आपल्याला आयुष्याकडून काय हवं आहे याबद्दलच्या त्यांच्या कल्पना पुरेशा स्पष्ट आहेत. या पिढीला लग्न करायचं असेल तर पारंपारिक कांदेपोहे प्रकरणातून जोडीदार निवडायला बिलकुल आवडत नाही. जोडीदाराच्या निवडीसाठी डेटिंग किंवा मॅट्रिमोनी वेबसाइट‌्स धुंडाळणं त्यांना सोपं वाटतं. भारतात ६९ टक्के पुरुष आणि ५६ टक्के स्त्रियांना अॉनलाइन डेटिंग जोडीदार शोधण्यासाठी योग्य मार्ग वाटतो. त्यामुळेच भारतात डेटिंग अॅप्स किंवा अॉनलाइन विवाहसंस्था दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालल्या आहेत. भारतात सुमारे १५०० अॉनलाइन विवाहसंस्था आहेत. तसंच टिंडर, ट्रुलीमॅडली, ओकेक्युपिड, बंबल अशा डेटिंग अॅप्सचं प्रमाण वाढत चाललं आहे. उदाहरणार्थ, २०१७ पेक्षा २०१८ मध्ये भारतात डेटिंग अॅप्स वापरण्याचं प्रमाण ४० टक्के वाढलं आहे. फेसबुक, व्हॉट‌्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, मायस्पेस अशा समाजमाध्यमांवरच्या ओळखींचाही जोडीदार निवडण्यासाठी वापर केला जातो. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमुळे भारतातल्या तरुणींना आपला जोडीदार स्वत: निवडावा असं वाटण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण त्याचबरोबर आपल्याकडे स्त्रियांना निवडस्वातंत्र्य कमी असल्यामुळे त्यांना जोडीदार निवडताना अॉनलाइन डेटिंग/मॅट्रिमोनी साइट‌्स वापरण्याचे फायदे जास्त होऊ शकतात. या पद्धतीत आपल्या इच्छा, भावना, आशाआकांक्षा, आवडीनिवडी, जीवनमूल्यं, आर्थिक/सामाजिक / राजकीय /धार्मिक विचारांशी ज्याचे विचार जुळू शकतील असा जोडीदार मिळण्याची शक्यता वाढते. पण अॉनलाइन माहिती देताना ६१ टक्के जण खोटं बोलतात असं आढळून आलं आहे. त्यामुळे अॉनलाइन ओळखींमधून स्त्रियांच्या फसवणुकीचं प्रमाण वाढत जातं. यात तिशीच्या पुढच्या आणि श्रीमंत स्त्रियांची फसवणूक जास्त प्रमाणात होते. तसंच अशा फसवणुकीला बळी पडणाऱ्या स्त्रिया एकटं राहणाऱ्या, भावनाप्रधान असतात. स्त्रियांना फसवलं जाण्याची पद्धत साधारणपणे सारखीच असते. एकदा अॉनलाइन संपर्क झाल्यावर तीच व्यक्ती  दुसऱ्या माध्यमावर फेक अकाउंट घेते. लग्नाची किंवा डेटिंगची वचनं दिली जातात. मग बहुधा हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे या कारणानं आर्थिक मदत मागितली जाते. एकदा पैसे भरल्यानंतर समोरचा गायब होतो. बदनामीच्या भीतीनं अशा कित्येक केसेसची तक्रारही स्त्रिया नोंदवत नाहीत. यासाठी डेटिंग/मॅट्रिमोनी साइट किंवा समाजमाध्यमं वापरताना ओळख झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी आणि सुरक्षित वेळी समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटायला हवं. समोरचा पुरुष तुमचेच पैसे घेऊन तुम्हाला भेटवस्तू देतोय का,  असा विचार करायला हवा. समोरच्या पुरुषाचे नातेवाईक/मित्रमैत्रिणी/समाजमाध्यमांवरची प्रोफाइल्स यात संशयास्पद असं काही आढळलं तर सावध व्हायला हवं. मित्रमैत्रिणींशी याबद्दल चर्चा करायला हवी. जोडीदार शोधताना किनाऱ्यापर्यंत पोचवणारा प्रेमिक धुंडाळताना तो तुम्हाला वादळातच ढकलून नाहीसा होणार आहे का, हा विचार करायला हवा.

संपर्क :  ९९२२४४५४५६     

बातम्या आणखी आहेत...