आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१ व्या शतकाची कादंबरी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीता वाघ  

आपलं धड-मस्तक-मेंदू हा स्वतःचाच असेल, त्या मेंदूतलेे विचारही आपलेच राहावेत असं वाटत असेल, तर गिरीश यांची ही कादंबरी एकदा जरूर वाचावी अशीच आहे. प्रत्येक युवकाने संग्रहित ठेवावा असाच हा अनमोल वैचारिक ठेवा आहे. 
 
तरुणांच्या मनात खोलवर अस्वस्थता निर्माण करणारे असंख्य प्रश्न, प्रश्न निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेली आजूबाजूची चांगली-वाईट परिस्थिती. एकाच वेळी आयुष्य सुंदर करणारे व मन विषण्ण करणारे भोवताली होणारे कित्येक बदल, त्याच बदलांना स्पर्श करणाऱ्या मानवी-अमानवी भावना, समाजाने बांधून दिलेल्या चौकटीच्या चक्रव्यूव्हात सापडलेली कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था व एकविसाव्या शतकातले आधुनिक विचार नि त्यात गुरफटून राहिलेली युवा पिढी. या सर्व आर्थिक, राजकीय, सामाजिक बदलातून-शोषणातून निर्माण झालेल्या विद्रोहातून मोर्चे-आंदोलने व जन्मास आलेल्या सामाजिक संघटना-चळवळी यांचं हुबेहूब चित्र डॉ. गिरीश यांनी त्यांच्या  कादंबरीच्या माध्यमातून मांडलं आहे. मागच्या तीस वर्षांत झालेल्या “बदलास” निरपेक्ष भावनेने, निःपक्षपातीपणाने तितक्याच निर्भीडपणे तर कधी हळुवारपणे, कधी वाऱ्याच्या वेगाने ही कादंबरी सत्याचा शोध घेते. लेखकाने संवेदनशीलपणे कादंबरीमध्ये सुहास व सुखदा या पात्रांच्या माध्यमातून तरुणांच्या मनातील प्रश्नांचा ऊहापोह केलाय. फक्त ऊहापोहच नाही तर त्या प्रश्नांवर प्रेम, मैत्री या नाजूक नातेसंबंधांतून चर्चा फुलवलीय. एकमेकांच्या भिन्न विचारसरणीचा आदर करणारी या कथेतील माणसं निखळ व निर्मळ मनाची आहेत. मन आभाळाहून विशाल असलं की माणूस एकमेकांच्या होणाऱ्या बदलांना सहज स्वीकारतो. अशाच बदलांसोबत ही कादंबरी मुंबई ते सोलापूर व न्यूयॉर्कहून पुन्हा मुंबई असा प्रवास करत सोलापूरमधल्या सांडव नावाच्या छोट्याशा खेड्यात एका शेतकऱ्याच्या घरात जाऊन पोहचते. गावाकडचा आपलेपणा व मुंबईमधला कोरडेपणा मनाला हळवं करून जातो. विश्वबंधू नावाचं पात्र खऱ्या अर्थाने “विश्वबंधुत्वाची” शिकवण देऊन जात. मुमताज नावाची सोलापूरची सामान्य शिक्षिका ते जग अनुभवून आलेली सुखदा या दोघींची समाजाला सारख्याच प्रमाणात गरज आहे.  ही कथा आहे. अठरापगड जातीतील, धर्मातील तरुणांची, देशी-विदेशी बदलांची, शहरी-ग्रामीण नि गरीब-श्रीमंतीमधील अंतराची, नैतिक-अनैतिक, जागतिकीकरणातील आर्थिक व सामाजिक शोषणाची, या सर्व समस्यांच्या गुरफटलेल्या व गोंधळलेल्या माणसांची. अंधश्रद्धा, मानपानाच्या कुप्रथा, मनोविकार, सेक्स वर्करचे नवे जागतिक शोषण, आदिवासी, सुन्नी विरुद्ध शिया, यावर परखडपणे भाष्य करताना देशाच्या व वयाच्या सीमारेषा तोडून मानवतेच्या विशाल जगात लेखक घेऊन जातो. युवकांचं  आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व मानसिक शोषण होत आहे. मोठ्या प्रमाणात युवा पिढी त्यांच्याही नकळत यात भरडली जात आहे. अशा परिस्थितीत तरुणांनी भूतकाळातून धडा घेऊन वर्तमानात जगताना व भविष्याच्या दिशेने वाटचाल करताना त्यांची वैचारिक बैठक पक्की असणं गरजेचं आहे! त्यासाठी ही कादंबरी वाचावी... 

लेखिकेचा संपर्क : ७७७५०१९२८६

बातम्या आणखी आहेत...