आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुसमट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिन नुकताच झाला. पण दरवर्षीप्रमाणे मनात स्वतःशीच एक द्वंद्व चालू आहे, माझंच मन मला खातंय. नेहमीच होणारी घुसमट आज प्रचंड जाणवते. थंड हवेच्या सान्निध्यात जेवढं मोकळं वाटतं तेवढं मोकळं आज का वाटू नये, हा प्रश्न पडतो. एरवी बाईला तसूभरही मान न देणाऱ्या समाजातल्या सगळ्याच घटकांकडून आजच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या शुभेच्छाच घ्या. कधी कोण्या पुरुषाने रस्त्यावर मुलीची छेड काढली, कधी व्हाॅट्सअॅपवर कोण्या मुलीचा अनादर झाला तर तिला साथ न देणारे महिला-पुरुष जेव्हा आज आठवणीने व्हाॅट्सअॅपवर महिला दिनाच्या शुभेच्छा देतात, तेव्हा कमालीची अस्वस्थता जाणवते. 


लहानपणापासूनच मोठ्या आनदांत महिला दिन साजरा होताना बघत आले आहे. मीही कधीतरी या सोहळ्याचा भाग झालेली. शाळेत असताना स्त्री-कर्तृत्वावर, सावित्रीबाई फुलेंवर भाषणं ठोकलेली. मी बोलत होते, कोणत्या तरी पुस्तकात वाचलेल्या बाईपणाच्या वेदनाही मांडत होते; त्या वेदना मात्र मला कुठंही शिवलेल्या नव्हत्या आणि कशा असणार? मी माझ्या खेळण्याबागडण्यात व्यग्र आणि मस्त होते. पण तरीही मी व्यक्त केलेले शब्द माझ्या काळजात पुसटसे का होईना पण खोलवर रुतलेले होते. ते शब्द मला माझ्यातल्या स्वत्वाची, स्त्रीवेदनेची जाणीवही करून द्यायचे, पण ती जाणीव मर्यादित होती. खूप अभ्यास करून मोठी पदवी मिळवायची, नोकरी करायची, पैसा मिळवायचा म्हणजे मी यशस्वी होईन, असा गोड गैरसमज त्या वेळी होता!


जसजशी मी मोठी होत गेले, तसतशी माझ्यातली स्त्री मोठी होत गेली, त्यातलं माझंच खुजेपण मला जास्त जाणवू लागलं. या खुजेपणानेच माझ्यातल्या बाईशी माझी ओळख करून दिली. मी शिक्षण घेते, मोकळेपणाने वावरते पण कुठं तरी माझा श्वास गुदमरतोय याची जाणीव सारखी मनाला व्हायची. मायबापाच्या छत्रसावलीखाली असूनही माझ्यातलं रितेपण मला स्पष्ट जाणवायचं. चुलीवर स्वयंपाक करणारी स्त्री बघितली व त्या जाळाच्या प्रकाशात स्त्री-वेदनेची पहिली सावली मी अनुभवली. पोळी भाजते आहे पण हाताला लागणाऱ्या चटक्याची जाणीव तिला का होत नसेल? रस्त्याने चालताना चार नजरा मला बघणार म्हणून मी का खाली मान घालून चालायचं, मीच का ओढणी घ्यायची, पुरुष घेतो का कधी ओढणी? हे प्रश्न आतल्या आत बोचायचे. आणि आज रीतीभातीच्या चौकटीत अडकलेली आजची आधुनिक स्त्री बघते, स्त्रीलाच स्त्रीचा विटाळ होताना बघते. आजही मासिक पाळी लाबांवी म्हणून सुशिक्षित मुलींना गोळ्या घेताना बघते तेव्हा काळजात चर्रर्र होतं. किती स्वतःच्या आरोग्यासोबत खेळणार आहोत आपण? एवढा का आपला जन्म स्वस्त आहे. जे शिक्षण आपल्याला “स्व”ची ओळख करून देत नाही त्या शिक्षणाला अर्थ काय? 


घरात बाई म्हणून वावरताना पारंपरिक विचारांची स्त्री नकळतपणे नवऱ्यासोबतच्या संबंधाला, आईपणाला अवास्तव महत्त्व देते. लैंगिक संबंधांमध्ये स्त्रीची भूमिका पूर्णपणे शरणागती स्वीकारणारी असते. एक प्रकारे स्वतःला सोन्याच्या पिंजऱ्यातच ती कैद करून घेत असते. मग बाहेरच्या जगात वावरण्यासाठी, या पिंजऱ्यातून सुटण्यासाठी नोकरी करण्याचा मार्ग स्त्री स्वीकारते. पण फक्त नोकरी करून हा प्रश्न सुटणार आहे का? ती कमवती झाली तशी ठरवती झाली का? स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीची मुक्ती, पण कशाकशातून? गुलामगिरीतून? अत्याचारापासून? गरिबीतून? दुबळेपणातून? की पुरुषांच्यामक्तेदारीतून?
का तिनेच स्वत:च स्वत:वर घालून घेतलेल्या बंधनातून?
हेच अजून अनेक स्त्रियांना कळलेलं नाही.
नवरा आंधळा होता म्हणून आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधणारी गांधारी आता नको आहे तर पतीच्या आंधळेेपणावर आपल्या डोळसपणाने त्यालाही दृष्टी मिळवून देणारी गांधारी आता अभिप्रेत आहे. 


स्त्रीला स्त्री म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा अर्थ कळायला हवा. तिला तिचे माणूस म्हणून असणारे हक्क कळायला हवे आणि स्त्रीत्वाला आपले दुर्दैव मानणाऱ्या स्त्रीने आपल्या माणूस म्हणून असलेल्या अस्मितेची ओळख पटवून घेऊन त्या अस्तित्वाचा सार्थ अभिमान बाळगायला हवा. म्हणजेच स्त्रियांजवळ असणारी सृजनाची क्षमता ही आपली शक्ती आहे, अडथळा नाही. म्हणूनच समाजाचे आणि पुरुषांचे अस्तित्त्व स्त्रियांवर अवलंबून आहे. हे पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनीही लक्षात घेतले पाहीजे. विचार बदलले जाणं गरजेचंच आहे. 


समाजातील कोणत्याही घटकाकडून होणारं स्त्रियांचं शारीरिक, मानसिक शोषण थांबवणं, हुंडा, गर्भलिंगनिदान थांबवणं, स्वकेंद्रित, संकुचित लोकांच्या विचारसरणीपासून स्त्रियांची मुक्तता करणं, ही आहे खरी स्त्रीमुक्ती. स्त्रीमुक्ती प्रत्यक्षात आणणं ही फक्त स्त्रियांची जबाबदारी नसून ती स्त्री आणि पुरुष दोघांचीही आहे. 


नीता वाघ, औरंगाबाद
neetawagh2@gmail.com

बातम्या आणखी आहेत...