Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Negative news will go from narendra modi sabha

नरेंद्र मोदींच्या सभेतून नकारात्मक बातम्या जाण्याची भाजपला धास्ती

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 10:16 AM IST

मैदानात साप असल्याचे कळताच सर्पमित्रांचीही भाजपने केली नेमणूक

 • Negative news will go from narendra modi sabha

  नाशिक - येत्या २२ एप्रिल रोजी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेच्या तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये व त्याद्वारे भाजपबाबत नकारात्मक बातम्या प्रकाशित होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून काळजी घेतली जात आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: यात लक्ष घातले असून कार्यकर्त्यांच्या जेवणावळींपासून ते सभेनंतरच्या स्वच्छतेपर्यंत कशी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


  नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सीमेवर मोदी यांची सभा होणार आहे. मुळात ही सभा पूर्वी १५ एप्रिल रोजी होणे अपेक्षित होते. मात्र मोदी यांच्या व्यग्र कार्यक्रमात तीन वेळा तारीख बदलली. आता २२ एप्रिल रोजी घेणे निश्चित झाले आहे. मोदी यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे तो भाग दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येतो. सभेसाठी जे मैदान निवडले आहे तेथे सापांचा सुळसुळाट असल्याची यापूर्वीच चर्चा झडली आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्पमित्रांना पाचारण करून एखादा सर्प निघालाच तर एेनवेळी गोंधळ उडू नये याची दक्षता घेतली जात आहे. आता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नियोजनासाठी नाशिकमध्ये नुकत्याच घेतलेल्या बैठकीतील मार्गदर्शन व्हायरल झाले आहे. त्यात मोदी यांच्या सभेत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी ते सूचना देताना दिसत आहेत.


  स्वच्छता, गर्दी पांगणार नाही याची काळजी घ्यावी
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानाला गती दिली आहे. देशाच्या विविध भागात त्यांनी याबाबत जनजागरण मोहिमेत स्वत: सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी रस्ते व परिसर स्वच्छ ठेवा. सभा झाल्यानंतरही त्या ठिकाणची साफसफाई झाली पाहिजे, अशा सूचना महाजन यांनी आयोजक कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पिंपळगावची सभा महाराष्ट्रात सर्वात मोठी ठरेल या दृष्टीने नियोजन करा, गर्दीही कमी होणार नाही वा सभा सुरू असताना लोक बाहेर पडणार नाहीत, तसेच धक्काबुक्की, चेंगराचेंगरीही होणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी आयोजक पदाधिकाऱ्यांना दिलेल्या असल्याची माहिती आहे.


  बटाटा भाजी खराब झाली तर खैर नाही
  ‘सभेसाठी सकाळी ७ वाजेपासून लोक येतील. ते भुकेले झाल्यानंतर त्यांना लवकर कसे जेवण द्यावे लागेल यावर गिरीश महाजन यांनी आयोजक पदाधिकाऱ्यांना पटवून सांगितले. ‘पोटात अन्न प्रथम गेले पाहिजे, अन्यथा खैर नाही’ अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यातही पुरी-भाजीतील बटाट्याची भाजी वा बटाटेवडा असा मेनू असेल. उन्हाचा कडाका बघता हे पदार्थ खराब होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सांगितले. पाहिजे तर एखाद्या हलवायाला विचारून कोणती भाजी चांगली टिकेल याचा सल्ला घ्या. नाही तर सभा राहिली बाजूलाच आणि अन्नातून विषबाधा अर्थातच फूड पाॅइझनिंगचीच ब्रेकिंग होईल, अशी भीतीही महाजन यांनी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

Trending