Home | Magazine | Madhurima | Neha Dhole write about 'An informal day'

एक अनौपचारिक दिवस

नेहा ढोले | Update - Feb 12, 2019, 11:18 AM IST

सकाळी छान आवरून मस्त गरम चहाचा कप, आवडती खिडकी आणि अगदी नदीतल्या पाण्यासारखी शांत मी.

  • Neha Dhole write about 'An informal day'

    गजर वाजल्यावर पुन्हा बंद करून झोपण्याच्या आनंदापेक्षा गजर ऐकूही न यावा अशी गाढ झोप लागली तर परमानंद! वा! सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा पाहिलं तर साडेनऊ केव्हाच वाजून गेले होते. सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस, कामाचा महत्त्वाचा दिवस. तरीही सगळं बाजूला ठेवून आज मनाने मनासारखं जगायचं ठरवलं. कोणत्याही तणावाशिवाय झालेली सकाळ किती सुंदर असते हे तेव्हा मला अनुभवायला मिळालं.


    सकाळी छान आवरून मस्त गरम चहाचा कप, आवडती खिडकी आणि अगदी नदीतल्या पाण्यासारखी शांत मी. आणि मग त्या पाण्यावर कुणी तरी दगड मारावा आणि लहरी उठवाव्या आणि पाण्याची शांतता भंग करावी तसा माझा फोन वाजावा. पण त्याचा आवाज त्या एका दिवसासाठी का होईना दाबून टाकावा म्हणून फोन बंद करावा आणि पुन्हा तीच शांतता. मग आपणच आपल्याला दिलेला वेळ, तो एकांतात आपल्याच मनाशी साधलेला संवाद, आणि त्या संवादात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, किती ऐकण्यासारखं आहे जगात! बाहेरच्या गोंगाटात मी याचा आवाजच दडपून टाकला. आजकाल कानांना फक्त बाहेरचंच ऐकू येतंय, कुठे तरी आतला आवाज ते ऐकण्याचं विसरलेत. आज मनाशी संवाद साधताना खूप रिलॅक्स वाटत होतं. आज त्या मनाला स्वच्छंदी जगण्याची मुभाच जणू मी दिली होती. छे! मी दिली नाही, त्याने मिळवली.


    आज ते नेईल तिथे मी जाणार, आज त्याच्या इच्छेनुसार जगणार. आणि तयार होण्यासाठी मग कपाट उघडलं. ऑफिसचे रोजचे फाॅर्मल कपडे बघून तर दोन मिनिटे मळमळच झाली! आज तर त्या प्रेसच्या कपड्यांकडे पाहायचंही नाही, ही तर मला सक्त ताकीदच त्याने देऊन ठेवली. तेव्हा मला कळालं खरंच इनफाॅर्मल, अनौपचारिक जगणं किती छान असतं! फॉर्मलचा मुखवटा उतरवला की उरतो “खरे”आपण! आणि हाच खरा मी कितीतरी दिवसांनी मी आज पहिला. मग गाडी सुरू करून जिकडे वाट दिसेल तिकडे जावं, मनाला आवडत तिथे, जे वाटेल ते खावं. असं जगताना खरंच जाणवलं की, आज मन शांत आहे, तर बाहेरचा गोंगाटही ऐकू येत नाही, एक वेगळाच अनुभव! आणि पुन्हा घरी येऊन आपलं आवडतं पुस्तक आणि खिडकी आणि चहा. आणि जाणीव व्हावी आज मन आणि बुद्धीच्या द्वंद्वात मनाचा विजय झाला.

Trending