आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रकारांचा कोल्हापुरी गुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


छायाचित्रण कलेकडे कला, शिस्त आणि छंद म्हणून पाहणाऱ्या, या कलेचं पावित्र्य जपण्यासाठी धडपडणाऱ्या ए. एस. ज्ञानेश्वर वैद्य यांच्याबद्दल आजच्या भागात...

ए एस. ज्ञानेश्वर वैद्य ही छायाचित्रणाची पदवी मिळवणारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती. त्यांनी छायाचित्रणात AFIP ही राष्ट्रीय तर AFIAP ही आंतरराष्ट्रीय पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी छायाचित्रणात तीन वर्षांत छत्तीस सुवर्णपदके, बावीस रौप्य पदके, तर सोळा कांस्यपदके जिंकलेली आहेत. ते छायाचित्रकारांचे गुरू म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ओळखले जातात.


ज्ञानेश्वर वैद्य यांनी त्यांच्या नावाआधी एएस (as) ही आद्याक्षरे त्यांचे गुरू अशोक सरवानन यांच्या सन्मानार्थ लिहिण्यास सुरुवात केली. छायाचित्रांच्या स्पर्धेत ते प्रथम जोधपूर येथे २०१६ साली उतरले. त्यात त्यांनी सुवर्ण व रौप्य पदके पटकावली. तेथपासून त्यांना छायाचित्रण स्पर्धेत बक्षिसेच बक्षिसे मिळत गेली आहेत. नागा साधूच्या छायाचित्राला अमेरिकेत मिळालेले बक्षीस हे त्यांचे परदेशातील पहिले सुवर्णपदक. त्यांनी २३ देशांतील स्पर्धांत सहभाग घेतला असून  त्यात त्यांनी १९७ पदके आणि ७४ प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. ‘नॅशनल जिओग्राफिक’ या जगप्रसिद्ध मासिकाने त्यांचे ५७ फोटो ‘एडिटर्स फेवरेट’ म्हणून घोषित केले आहेत आणि १२ फोटो प्रसिद्ध केले आहेत. छायाचित्रणातील ‘मोशन ब्लर’ या प्रकाराचे फोटो काढण्यात त्यांचा हातखंडा आहे.


ज्ञानेश्वर वैद्य मूळचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर गावचे. त्यांचे मन शालेय जीवनात रमले नाही. त्यांना मंत्र पाठ करण्याची आवड होती. म्हणून त्यांनी सातवी उत्तीर्ण झाल्यावर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वेदपाठशाळेत शिक्षण घेतले. कालांतराने ते कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे स्थायिक झाले. त्यांचा परिवार त्यांचे वडील प्रकाश वैद्य, त्यांची आई मेघा, पत्नी अन्नपूर्णा, त्यांच्या मुली मुद्रा आणि इंद्रायणी असा आहे. ते एकतीस वर्षाचे आहेत. ते कराटे शिक्षकही आहेत, उदरनिर्वाहासाठी याज्ञिकी करतात. त्यांना छायाचित्रणाची आवड लहानपणापासून होती, पण ती परिस्थतीअभावी जोपासता आली नाही. ते मित्रमंडळींसमवेत २०१३मध्ये रायगड किल्ल्यावर गेले असता त्यांनी तेथे कॅमेरा पाहिला. तेथेच त्यांना फोटो काढण्याची इच्छा निर्माण झाली. त्यावेळी आर्थिक परिस्थिती नव्हती पण त्यांनी परिश्रम करून जिद्दीने कॅमेरा घेतला आणि डिसेंबर २०१५पासून स्वतःला छायाचित्रण कलेत झोकून दिले.


ज्ञानेश्वर वैद्य यांना छायाचित्रण कलेसाठी तीन गुरू लाभले. सांगलीतील दिलीप नेर्लेकर हे त्यांचे पहिले गुरू. वैद्य यांनी स्वतः काढलेले फोटो नेर्लेकर यांना दाखवले. त्या वेळी त्यांनी ते फोटो पाहून “तुला शिकण्याची गरज नाही, तर तुला ती कला आधीच अवगत आहे,” असे सांगितले. त्यांनी नेर्लेकर यांच्याकडे सात दिवसांचा प्राथमिक कोर्स केला. कोर्सच्या शेवटच्या दिवशी, नेर्लेकर यांचे मित्र ज्येष्ठ छायाचित्रकार तिलक हरिया हे कार्यशाळा घेण्यासाठी आले आणि योगायोगाने, ते वैद्य यांचे दुसरे गुरू ठरले. त्यांनी ज्ञानेश्वर यांना फोटोग्राफीची प्रक्रिया, स्पर्धा, पदवी, प्रदर्शनातील सहभाग, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तिलक हरिया यांच्यामुळे वैद्य यांना तिसरे गुरू भेटले, ते म्हणजे चेन्नईचे अशोक सरवानन.


अशोक सरवानन आणि ज्ञानेश्वर वैद्य यांची गुरु-शिष्यांची कथा वेगळीच आहे. सरवानन यांना कृष्णधवल फोटोग्राफीमध्ये जास्त ओढ होती. तिलकसरांनी वैद्य यांना २०१६मध्ये एक लिंक पाठवली. ज्ञानेश्वर त्यातील फोटो पाहून भारावून गेले. त्यांनी सरवानन यांचाच शिष्य होण्याचे ठरवले. त्यांनी सरवानन यांना पहिला मेसेज हिंदीमध्ये केला. पण सरवानन यांना हिंदी कळत नव्हते. त्यांनी त्यांना इंग्रजीतून प्रतिक्रिया दिली. वैद्य यांना इंग्रजी वाचन-लिखाण येत नव्हते. मग त्यांनी तो मेसेज गुगल ट्रान्सलेशनमध्ये टाकून, अर्थ समजून घेतला आणि पुन्हा त्यांच्या उत्तरादाखल मराठी मेसेजचे रूपांतर इंग्रजीत त्याच पद्धतीने करून घेतले व सरवानन यांना पाठवले. त्या दोघांचा असा संवाद तीन वर्षे सुरू होता. त्यांनी एकमेकांची भाषा येत नाही म्हणून तीन वर्षे एकमेकांना फोन केला नाही. वैद्य येथून फोटो पाठवत. सरवानन त्यांची त्यावरील प्रतिक्रिया इंग्रजीतून सांगत. वैद्य पुन्हा ते मराठीतून वाचून सराव करत. अशी शिकवणी सुरू होती. सरवानन यांच्या ‘चेन्नई वीकेंड क्लिकर’ या टीमने तीन वर्षांनी प्रदर्शन भरवले. त्यात वैद्य यांचे पंधरा फोटो निवडून भिंतीवर लावले होते! ती गुरु-शिष्य जोडी त्या तीन वर्षांत चेन्नईमध्ये आदर्श ठरली. त्यांची भेट चौथ्या वर्षी जेव्हा झाली तेव्हा सरवानन यांनाही फार आश्चर्य वाटले - असासुद्धा एखादा शिष्य असू शकतो! ज्ञानेश्वर वैद्य यांच्या नावाआधीच्या एएस या आद्याक्षरांत गुरु-शिष्य नात्याची आणि त्यांच्या शिकवणीची अशी गोष्ट दडली आहे.


ज्ञानेश्वर वैद्य त्यांचे छायाचित्रणाचे शिक्षण पूर्ण करून जेव्हा ती कला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बाहेर पडले त्या वेळी त्यांना अनेक समस्या जाणवल्या. त्यांनी पाहिले की काही फोटोग्राफर्स खास फोटो मिळवण्यासाठी तशी दृश्ये घडवून आणतात! त्यामुळे त्यातून जीवनाचे स्वाभाविक दर्शन होत नाही. त्यात फसवणूक असते. ते सांगतात की, काही फोटोग्राफर जेजुरीच्या यात्रेदरम्यान एका आजोबांना भर उन्हात उभे करून फोटो घेत होते. त्यांचा पाच-सहा वेळा रिटेक करून फोटो घेण्याचा प्रयत्न चालू होता. शेवटी आजोबांना चक्कर आली आणि ते खाली बसले. दोघांनी आजोबांना काखेत उचलून उभे केले. पण त्यांची सुटका त्यांना पाहिजे होता तसा फोटो मिळवल्यावरच केली. वैद्य यांनी वारकऱ्यांचा मुक्काम असतो तेथे सकाळी अंघोळीच्या वेळी जाऊन फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर वारकऱ्यांना त्रास देताना पाहिले आहे. फोटोग्राफर्स धार्मिक यात्रांना जाताना व्यसन करतात. त्यांना पठ्ठनकोडोलीच्या यात्रेत एक फोटोग्राफर डाव्या हातात कॅमेरा आणि उजव्या हातात सिगारेट घेऊन फिरताना दिसला. फोटोग्राफर केवळ फोटो काढण्यासाठी आलेला असतो. त्याला त्या जागेचे पावित्र्य, महात्म्य यांचे भान नसते. त्यांनी एका फोटोग्राफरने प्रवचन करणाऱ्या महाराजांच्या आसनावर चप्पल न काढता चढून गर्दीचा फोटो काढताना पाहिले! काही वेळा फोटोग्राफर लोकांना फोटो काढण्यासाठी लुटतात तर काही वेळा लोक स्वतः चा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरना लुटतात. फोटोग्राफीबाबत अशा अनेक वाईट अनुभवातून त्यांनी जनजागृतीचे कार्य करण्याचा ध्यास घेतला. त्या जिद्दीने ज्ञानेश्वर वैद्य यांनी २०१६ साली कोल्हापूर अॅमॅच्युअर फोटोग्राफर असोसिएशन (कापा) या संघटनेची स्थापना केली. त्या असोसिएशनचे उद्दिष्ट कोणाचाही बुद्धिभेद न होता छायाचित्रणाची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने देणे हा आहे. तसेच, छायाचित्रणकलेचा उपयोग हा केवळ छंद म्हणून करावा; त्याचसोबत तो छंद शिस्तीने जपला गेला पाहिजे. शिरोळ, जयसिंगपूर, सातारा, पुणे, मुंबई, हंपी या भागांतील फोटोग्राफी छांदिष्ट व्यक्ती ‘कापा’मध्ये एकत्र आले आहेत. वैद्य यांनी छायाचित्रकारांकडे उपलब्ध असलेल्या कमी साहित्यातही उत्तम फोटो काढण्याचे प्रशिक्षण त्या संघटनेत दिले आहे. ज्ञानेश्वर वैद्य यांचे ‘कापा’द्वारे शंभराहून अधिक शिष्य तयार झाले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे शिष्यदेखील त्यांच्या नावाआधी डी म्हणजेच ज्ञानेश्वर यांचे नाव लावतात. वैद्य यांच्या प्रशिक्षण शिबिरात फोटो काढताना कोणत्याही व्यक्तीला त्रास न देणे, व्यसन न करणे, वातावरणाला साजेसा पेहराव असणे, कोठेही गैरप्रकार घडत असेल तर त्वरित तो रोखणे या नियमांचे पालन करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. पठ्ठणकडोली यात्रा, आषाढीची वारी, जोतिबाची यात्रा, जेजुरीची सोमवती अमावस्या अशा ठिकाणी जाऊन फोटोग्राफर शिस्तबद्धतेने फोटो घेऊ लागले. ज्ञानेश्वर वैद्य यांच्या शिष्यांनी साडेतीनशेहून अधिक सुवर्णपदके मागील तीन वर्षांत जिंकली आहेत. वैद्य सांगतात की, मी छायाचित्रण कलेकडे छंद म्हणून पाहतो. मी त्याचे पैसे घेत नाही. कोणत्याही कलेत शिस्त पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. मी माझ्या गुरूंकडून शिस्त शिकलो, ज्ञानेश्वर, महाराष्ट्राची संस्कृती, हिंदू धर्म आणि त्याचे पावित्र्य हे शिस्तीने छायाचित्रणातून समाजात पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अॅमॅच्युअर फोटोग्राफर असोसिएशन (कापा) कोल्हापूर
संस्थापक- ज्ञानेश्वर वैद्य 7083732984
vaidyadnyaneshwar0@gmail.com

बातम्या आणखी आहेत...