आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधींची मारेकरी नलिनीच्या उल्लेखानेही घाबरतात तिचे शेजारी; असा आहे पॅरोलमधील दिनक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेल्लोर/चेन्नई - शहर-वेल्लोर. स्थान-सथुवाचारी ठाणे. वेळ-सकाळी १० वाजून १५ मिनिटे. ठाण्यात फोन येतो. एक उपनिरीक्षक फोन घेतात, ते तामिळी भाषेत आपल्या सहायकाला कोणीतरी येत असल्याची माहिती देतात. सतर्कता वाढते. आतापर्यंत भिंतीला टेकलेली महिला सुरक्षा रक्षक आपली थ्री नाॅट थ्री बंदूक घेऊन गेटवर उभी राहते. थोड्याच वेळात पोलिसांच्या बसमधून ८ ते १० सुरक्षा रक्षकांसह एक अतिशय सामान्य शरीरयष्टी असलेली, निळ्या रंगाची गोल्डन बाॅर्डरची साडी नेसलेली महिला उतरते. केसांत पांढऱ्या आणि लाल फुलांची वेणी माळलेली ही महिला वेगाने पुढे येते. पोलिसांच्या व्हिडिओ रेकाॅर्डिंगदरम्यान ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्याला स्मितहास्य करत अभिवादन करते. टेबलवर रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करते, नंतर त्याच वेगात पुन्हा बसमध्ये चढते. सुमारे ६० ते ७० सेकंदांच्या या घटनाक्रमातील ही महिला एखादी सामान्य महिला नाही, ती आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी ५२ वर्षीय नलिनी श्रीहरन.
 
नलिनी देशातील सर्वात जास्त काळ तुरुंगात राहणारी महिला कैदी आहे. गेल्या २८ वर्षांपासून तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनीला तिची मुलगी हरिथ्राच्या लग्नाच्या तयारीसाठी २५ जुलैला ३० दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले. हायकोर्टाने २३ आॅगस्टला पॅरोल आणखी तीन आठवड्यांनी वाढवला आहे. हरिथ्रा लंडनमध्ये तिच्या काकांकडे वाढली आणि आता डाॅक्टर झाली आहे. पॅरोलच्या अटीनुसार नलिनीला रोज पोलिस ठाण्यात येऊन स्वाक्षरी करायची आहे. स्वर्ण लक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध तामिळनाडूचे वेल्लोर सध्या यामुळेच सतत चर्चेत आहे. नलिनीला कठोर अटींसह पॅरोल मिळाला आहे. ठाण्यापासून फक्त २५० मीटर दूर रंगापुरममध्ये ईसीआय चर्चच्या समोर पाॅश काॅलनीत दोन मजली घरात कडक सुरक्षा व्यवस्थेत नलिनी राहत आहे. तेथे २४ तास १५ पोलिसांचा पहारा असतो. घराबाहेर सात ते आठ सुरक्षा रक्षक आणि घरात महिला पोलिस कर्मचारी २४ तास ड्यूटी करतात. गल्लीच्या कोपऱ्यावर बंद वाहनात डीएसपी दर्जाचे पोलिस अधिकारी निगराणी ठेवतात. घरात नलिनीची आई पद्मावती आणि एका मोलकरणीलाच सोबत राहण्याची परवानगी आहे. निर्धारित वेळी फक्त रक्ताचे नातेवाईकच नलिनीला भेटू शकतात. या मोजक्याच लोकांसोबत नलिनी मुलीच्या लग्नाचे कार्यक्रम निश्चित करत आहे. 

लग्नासंदर्भातच नलिनी १४ आॅगस्टला पतीला भेटण्यासाठी सेंट्रल जेलमध्ये गेली होती. त्यांची भेट ४५ मिनिटे चालली. पॅरोल काळादरम्यान नलिनी ठाण्यात हजेरी लावण्याव्यतिरिक्त परवानगीविना कुठेही जाऊ शकत नाही. काॅलनीत राहणारे लोक नलिनीबाबत कोणतीही चर्चा करत नाहीत. बोलण्याचा प्रयत्न केल्यास शेजारी घरात निघून जातात. हायकोर्टात पॅरोलप्रकरणी बाजू मांडणारे नलिनीचे वकील एम. राधाकृष्णन आणि पी. पुगालेंधीही न्यायालयाचा हवाला देत चर्चा करण्यास नकार देतात. नलिनीची मुलगी लंडनमध्ये डाॅक्टर असून तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. मुलगी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात येऊ शकते. श्रीलंकेत राहणारे नलिनीचे काही नातेवाईकही येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच तिच्या लग्नाच्या तयारीला अंतिम रूप दिले जाईल. सध्या लग्नाची तारीख, मुलीचे लग्न कोणाशी होत आहे, लग्नाचे ठिकाण याबाबत कुठलीही माहिती देण्यास कोणीही तयार नाही. त्याचे कारण बहुधा कोर्टाच्या अटी आणि सुरक्षा हे असू शकते. त्यामुळेच नलिनी चेन्नईच्या रोयापेट्टाएेवजी वेल्लोरमध्ये भाड्याच्या घरात राहत आहे.मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एम. निर्मलकुमार यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने ३० दिवसांचा पॅरोल दिला आहे. नलिनीने सहा महिन्यांचा पॅरोल मागितला होता. तयारी पूर्ण न झाल्याचा हवाला देत नलिनीने पुन्हा एक महिन्याचा पॅरोल मागितला, याचिकेवर सुनावणीनंतर २२ आॅगस्टला पॅरोलचा अवधी तीन आठवडे वाढवण्यात आला. नलिनीला याआधी तिच्या भावाचे लग्न आणि वडिलांच्या मृत्यूनंतर २०१६ मध्ये अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी असा दोनदा खूप कमी अवधीसाठी पॅरोल मिळाला होता. 

२१ मे १९९१ ला माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या झाली होती. त्यात राजीव गांधींसह १४ जण ठार झाले होते. नलिनीला १५ जून १९९१ रोजी चेन्नईतून अटक करण्यात आली होती. तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. याप्रकरणी १९९९ मध्ये नलिनीसह सात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, ती नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...