आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हत्या : खंडणीसाठी शेजारी राहणाऱ्या मुलाचा खून करून मृतदेह पुरला 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पंचवीस हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाला पार्टी देण्याचा बहाणा करून निर्जनस्थळी नेत त्याचा खून करून मृतदेह मित्राच्या मदतीने पुण्यातील दोडके फार्म हाऊस परिसरात पुरल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. नायब तहसीलदार संजय भोसले आणि सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंके यांच्या उपस्थितीत पंचनामा करून पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. 

 

निखिल अनंत अंग्रोळकर (१६, रा. विठ्ठलनगर, शिवशक्ती चौक, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बिनयसिंग वीरेंद्रसिंग राजपूत (२३) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार ऋषिकेश पोळ याला ताब्यात घेण्यात आले आहे. राजपूत आणि अंग्रेळकर हे गेल्या पाच वर्षांपासून शेजारी आहेत. निखिलचे कुटुंबीय मूळ बेळगावमधील हालशी खानापूर येथील असून त्याच्या वडिलांचा पुण्यात फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. निखिल हा वारजे परिसरातील माॅडर्न शाळेत दहावी इयत्तेत शिकत होता, तर बिनयसिंग हा मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी असून वारजेतील पार्थ जिममध्ये तो सध्या प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. रविवारी रात्री नऊ वाजता निखिल घरातून बाहेर गेल्यानंतर तो परत घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी निखिल बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. 

 

मुलगा बेपत्ता झाल्याने दोन दिवस पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मुलाच्या घराशेजारी व शाळेत जाऊनही चाैकशी करण्यात आली. त्या वेळी राजपूतसोबत तो रविवारी रात्री फिरताना काही जणांनी पाहिले होते. त्यानुसार पोलिसांची त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. 

 

निखिलच्या शोधासाठी कुटुंबीयांसोबत फिरला 
निखिल बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर अंग्रोळकर यांनी काही ठिकाणी निखिल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यात आरोपी बिनयसिंगदेखील सहभागी झाला होता. या वेळी अंग्रोळकर यांना कसलाही संशय येऊ दिला नाही हे विशेष. दरम्यान, बिनयसिंग याला मी पैसेही दिले असते. मात्र, त्याने मुलाला मारायला नको होते,असा हंबरडा त्याच्या वडिलांनी फोडला. 

 

आरोपी बिनयसिंगला झाले होते कर्ज 
आरोपी बिनयसिंग याला २५ हजार रुपयांचे कर्ज झाले होते. निखिलच्या वडिलांकडे खूप पैसा असल्याचे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने निखिलचे अपहरण करून अनंत अंग्रोळकर यांना खंडणी मागण्याचा त्याने कट रचला. यासाठी त्याने जिममधील ऋषीकेश पोळ यालाही सोबत घेतले. तिघेही दोडके फार्मवर बुधवारी रात्री आले. मात्र, निखिलचे अपहरण केल्याचे समजल्यास त्याचे वडील आपल्याला सोडणार नाहीत, या भीतीने त्याने निखिलच्या डोक्यात सिमेंट वीट मारून त्याचा खून केला. त्यानंतर ऋषीकेशच्या मदतीने त्याचा मृतदेह पुरला. मात्र, दोन दिवस ऋषीकेश याने खाणे- पिणे सोडल्याने कुटुंबीयांनी त्याची चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्याने आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर बिनयसिंग याला पोलिसांनी अटक केली. 

 

बातम्या आणखी आहेत...