आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्गत राजकारणाने नेपाळची कवायतीतून माघार : भारत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पुण्यात सुरू असलेल्या बिम्सटेक देशांच्या संयुक्त लष्करी कवायतीत नेपाळ सहभागी झाला नाही. नेपाळची तुकडी भारतात कवायतीसाठी दाखल झाल्यानंतर नेपाळने हा निर्णय घेतला आहे. अंतर्गत राजकारणाने नेपाळने कवायतीतून माघार घेतली आहे. 


नेपाळ बिम्सटेकमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारताच्या प्रयत्नांवरही समाधानी नाही. नेपाळ चीनसोबत संयुक्त लष्करी कवायत करेल. ही कवायत चीनच्या चेंगदूमध्ये १७ ते २८ सप्टेंबरपर्यंत चालेल. दोन आठवड्यांपूर्वी बिम्सटेक देशांत भारत, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान व नेपाळ काठमांडूत झालेल्या शिखर परिषदेत दहशतवाद मोडीत काढण्यासाठी एकत्र आले होते. दरम्यान, नेपाळचे नवीन लष्करप्रमुख पूरना चंद्र थापा यांनी बिम्सटेक राष्ट्रप्रमुखांच्या संमेलनासही हजर न राहण्याचा निर्णय जाहीर केला. 


तज्ञांचा इशारा : नेपाळने भारताला खिजवू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील 
भारतीय तज्ञांनी नेपाळच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आहे. माजी विदेश सचिव कंवल सिब्बल म्हणाले, बिम्सटेक कवायतीत सहभागी झाला असता तर चीनसोबतची कवायत संतुलित मानली असती. नेपाळने भारताला खिजवू नये. यामुळे भारताची नेपाळबाबत भूमिका बदलू शकते. परिणाम भोगावा लागेल. 


नेपाळचे स्पष्टीकरण : चीनसोबतच्या कवायतीत आमचे केवळ २० जवान असतील 
नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल गोकुल भंडारी म्हणाले, नेपाळने चीनसोबत एप्रिलमध्येही लष्करी कवायत केलेली आहे. चेंगदूमध्ये होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायतीत नेपाळचे २० जवान सहभागी होतील. भारतासोबतच्या संयुक्त कवायतीत नेपाळचे ३०० हून जास्त सैनिक भाग घेतात. 


भारताशी अंतर का : भारतविरोधी भावनेमुळे ओली दोन वेळेस सत्तेत येऊ शकले 
गेल्या एका दशकापासून नेपाळमध्ये एक वर्ग भारतविरोधी प्रतिमेला बळ देत आहे. केपी शर्मा ओली नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर स्थिती आणखी बिघडली. ओली यांच्या कार्यकाळात नेपाळने चीनसोबत व्यापारी करार केले. नेपाळमध्ये चीन गुंतवणूक करत आहे. ओली भारतविरोधी भावनेमुळे दोन वेळा सत्तेत आल्याचे मानले जाते. ओली सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी नेपाळला येणारे पहिले राष्ट्रप्रमुख होते. 


चीनशी जवळीक का : अवलंबित्व कमी करण्यासाठी ओबीओआरशी जोडण्याची इच्छा 
चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाला भारत विरोध करत आहे. नेपाळने याचे समर्थन केले आहे. ओली आपल्या पहिल्या कार्यकाळात चीनच्या दौऱ्यावर गेले होते. चीनने तिबेटसोबत आपल्या रस्त्यांचे जाळे विणावे, अशी इच्छा ओली यांनी व्यक्त केली होती. यामुळे नेपाळ जोडला जाईल व भारतावरील अवलंबित्व कमी होईल, हा उद्देश होता. वन बेल्ट वन रोड प्रकल्पाअंतर्गत चीन संपूर्ण जगात आपले अस्तित्व वाढवू इच्छित आहे. हा आशिया, युरोप व आफ्रिकेतील ६५ देशांना जोडणारा सहा आर्थिक कॉरिडॉरचा एकत्रित प्रकल्प आहे. 

बातम्या आणखी आहेत...