आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फूट पाडणाऱ्या राजकारणाला विरोधच होता' : ममता बॅनर्जी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपुरात आगरतळात रॅली काढण्यात आली. यात एकाने नेताजींची वेशभूषा केली होती. - Divya Marathi
त्रिपुरात आगरतळात रॅली काढण्यात आली. यात एकाने नेताजींची वेशभूषा केली होती.

दार्जिलिंग : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिंदू महासभेच्या फूट पाडणाऱ्या राजकारणाला सतत विरोध केला होता. त्यांनी धर्मनिरपेक्ष तसेच एकजूट भारतासाठी लढा दिल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी सुटी जाहीर करण्याचीही मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी हिंदू महासभेसदंर्भात केलेल्या वक्तव्यावरून आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ममता बॅनर्जी बोलत होत्या. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नेताजींनी आपल्या लढ्यातून सर्व धर्मांचा सन्मान करायला हवा असा संदेश दिला आहे. एकजूट भारतासाठी लढणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचेही त्यांनी सांगितले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १२ मे १९४० रोजी झारग्राममध्ये आयोजित सभेत हिंदू महासभेचा विरोध केला होता. आता मात्र धर्मनिरपेक्षतेचे पालन करणाऱ्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत नेताजी बेपत्ता होण्यासंदर्भातील रहस्य उलगडण्यासाठी सरकार गंभीर नसल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. वास्तवात काय झाले याचा शोध घेण्यासाठी पावले टाकली नाहीत. ७० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही आपण शोध घेऊ शकलो नाहीत की त्यांच्यासोबत काय झाले हे लज्जास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

ममतांवर हिंदू महासभेचा पलटवार

ममता बॅनर्जी यांनी हिंदू महासभेवर जोरदार टीका केल्याने हिंदू महासभेनेही त्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. हिंदू महासभेने ममता बॅनर्जी यांना बौद्धिक दिवाळखोर म्हटले आहे. मोदी सरकारशी लढताना पातळी सांभाळण्याचा सल्लाही दिला आहे. हिंदू महासभेने म्हटले आहे की, हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नेताजींना आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यासाठी मदत केली हाेती. ममता बॅनर्जी यांचे सध्याच्या स्थितीशी लढण्याचे सर्व पर्याय संपले असल्यानेच त्या खालच्या पातळीवर जात टीका करत असल्याचाही आरोप हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...