Home | National | Delhi | New Bill: National Security Agency Amendment Bill passed in the Lok Sabha

नवे विधेयक : राष्ट्रीय सुरक्षा संस्था दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित

वृत्तसंस्था, | Update - Jul 16, 2019, 08:18 AM IST

आम्हाला उगाच भीती दाखवू नका : ओवेसी, भीतीने तुमच्या मनातच घर केले आहे : शहा

 • New Bill: National Security Agency Amendment Bill passed in the Lok Sabha

  नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनआयए) दुरुस्ती विधेयक २०१९ सोमवारी लोकसभेत पारित झाले. या दुरुस्तीनुसार एनआयएला विदेशातही तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हे विधेयक लोकसभेत सहा विरुद्ध २७८ मतांनी पारित झाले. आता हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येईल.


  दुरुस्ती विधेयकावरील चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप झाले. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकावर मतदान घेण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री अमित शहा म्हणाले, मतदान व्हावे अशी त्यांचीही इच्छा असून त्यामुळे कोण दहशतवादाच्या विरोधात आहेत आणि कोण त्याला पाठिंबा देते हे लक्षात येईल. मात्र, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, सर्वांचा या विधेयकाला पाठिंबा आहे. सदस्यांना क्रमांक वाटप न झाल्याने चिठ्ठीद्वारे मतदान झाले. या वेळी झालेल्या चर्चेत काँग्रेसचे मनीष तिवारी, डीएमकेचे के. ए. राजा यांनी एनआयएच्या अधिकारांचा गैरवापर रोखण्यावर भर दिला.

  शहा-ओवेसी यांच्यात खडाजंगी
  एनआयए दुरुस्ती विधेयकावरील चर्चेवेळी गृहमंत्री अमित शहा आणि एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. ओवेसी शहा यांना म्हणाले, तुम्ही अंगुलीनिर्देश करून घाबरवण्याचे प्रयत्न करू नका. त्यावर शहा म्हणाले, भीती दाखवत नाही. भीती जेव्हा मनातच आहे तर त्याला आम्ही काय करू शकतो? शहा यांनी २००२ मध्ये आलेला दहशतवादविरोधी पोटा कायदा रद्द करण्यावरून यूपीए सरकारवर टीकास्त्र सोडले.

  दुरुस्ती विधेयकात नवे काय
  > विदेशातील भारतीयांच्या किंवा भारतविरोधी गुन्ह्यांचा तपास एनआयए करू शकणार

  > विदेशात गुन्हा नोंदवणे शक्य होणार, खटला दाखल करता येणार { नवे गुन्हेही एनआयएच्या तपास कक्षेत राहणार

  ९०% प्रकरणात दोषींना शिक्षा झाली
  एनआयए २७२ प्रकरणांचा तपास करत आहे. १९९ आरोपपत्रे सादर करण्यात आली आहेत. २७२ पैकी कोर्टाने ५१ प्रकरणी निकाल दिला आहे आणि ४६ प्रकरणात आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावली आहे. हे प्रमाण ९० टक्के आहे.

Trending