आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला स्वच्छतागृहात फेकले स्त्री जातीचे अर्भक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 यवतमाळ- वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ओपीडी शेजारी असलेल्या महिला स्वच्छतागृहात साधारणत: २ दिवसाचे एक स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. सोमवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या निंदनीय घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र गेल्या महिनाभरात अशा घडलेल्या दोन घटनांनी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 
बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश देत संपूर्ण देशात मोठे अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रसिद्धी करण्यात येत आहे. असे असले तरी दरदिवशी महिला, विशेषत: लहान मुलींच्या बाबतीत अप्रिय घटना घडत आहेत. या घटना पाहता त्यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडताना दिसत आहे. मुली नकोशा असतात त्यामुळे त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला, कचरा कुंडीत फेकून देण्याचे प्रकार सध्याही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशा प्रकारची घटना उघडकीस आल्यास ही घटना अनैतिक संबंधाची असल्याचे बोलल्या जाते. प्रत्यक्षात मात्र समाजात असलेली मुलींप्रतीची विकृतता या अनैतिक संबंधांच्या नावाखाली दडपण्याचा हा प्रकार असतो. त्यामुळे या प्रकरणात केवळ प्रसार प्रचारावरच न थांबता व्यापक प्रबोधनाची गरज आता निर्माण झाली आहे. 
असाच काहीसा गंभीर आणि तेवढाच निंदनीय प्रकार येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी उघडकीस आला. रुग्णालयात ओपीडी परिसरात असलेल्या महिला स्वच्छतागृहात साधारणत: दोन दिवसांचे एक स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. ही बाब निदर्शनास येताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या वेळी महिला स्वच्छतागृहासमोर गर्दी झाली. या संदर्भात माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्या अर्भकाला उचलून त्याची तपासणी करण्यात आली. त्यात ते अर्भक मृत आढळून आल्याने त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रवाना करण्यात आला. 


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप आणि शहर पोलिस ठाण्यातील पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने दुपार शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अनोळखी मातेविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या महिनाभराच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे या घटनेची गंभीरतेने दखल घेण्यात येईल की, दरवेळी प्रमाणे यंदाही गुन्हा दाखल होऊन तो डायरीत बंद राहील, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. 


बाहेरचे बाळ असल्याचा व्यक्त हाेताेय संशय 
जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या बाळाची नाळ ही एका विशिष्ट धाग्याने कॉट करण्यात आली असते. त्यासोबतच या ठिकाणी जन्मलेल्या बाळाच्या पायाचा ठसा निळी शाई लावून महिला रुग्णाच्या कागदपत्रावर घेतलेला असतो. त्यानंतर त्याची नोंद करून ते बाळ संबंधितांच्या ताब्यात देण्यात येते. या बाळाच्या पायावर निळ्या शाईचे कुठलेही अंश दिसून आले नाही. शिवाय बाळाच्या नाळेला रुग्णालयातील धागाही कॉट केलेला नव्हता. त्यामुळे हे बाळ दुसऱ्या ठिकाणावरून विल्हेवाट लावण्यासाठी या ठिकाणी आणून टाकले असल्याचा संशय रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. पहिल्या घटनेतील अहवाल अद्याप नाही 
जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या प्रवेशद्वाराजवळ १२ नोव्हेंबर रोजी एक अर्भक मृतावस्थेत आढळले होते. त्या अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याने ते स्त्री आहे की, पुरुष हे स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे ते अर्भक नागपूर येथे तपासणीसाठी पाठवले. तेथून अद्याप त्यासंदर्भात रिपोर्ट आलेला नाही. त्यातच सोमवारी पुन्हा एक स्त्री जातीचे अर्भक स्वच्छतागृहात फेकलेले आढळून आहे. 


मृतदेहाचे लचके तोडतात कुत्रे 
जिल्हा रुग्णालयाचा परिसर मोठा आहे. नवजात अर्भक या परिसरात इतरत्र फेकल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. त्यात काही जिवंत अर्भकेही आढळली. या भागात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात असल्याने अर्भकांच्या मृतदेहाचे लचके या कुत्र्यांकडून तोडले जातात. यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही आपल्या पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे मरण्यासाठी

फेकून देण्याचे प्रकार आजही घडतात ही खंत आहे. 

 

रुग्णालयातील रेकॉर्डचा ताळमेळ जुळतोय 
जिल्हा रुग्णालयात प्रसूती नंतर जन्मलेल्या बाळाची पूर्ण नोंद घेऊन बाळ संबंधितांच्या ताब्यात देण्यात येते. बाळ दगावले असले तरी त्याची नोंद घेऊनच ते त्यांच्या ताब्यात देण्यात येते. या घटनेची माहिती मिळताच गेल्या दोन दिवसांत झालेल्या प्रसुतींची तपासणी केली आहे. त्यात सर्व रेकॉर्डचा ताळमेळ जुळत आहे. सकाळी आढळलेले अर्भक हे १ किलो ६०० ग्रॅम वजनाचे आहे. त्यामुळे ते ६ ते ७ महिन्यात करण्यात आलेल्या प्रसूतीचे असावे. मात्र अशी प्रसुतीही दोन दिवसांत रुग्णालयात झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची तपासणी होणे आवश्यक आहे. डॉ. श्रीकांत वराडे, स्त्रीरोग विभाग प्रमुख, जिल्हा रुग्णालय. 


 

बातम्या आणखी आहेत...