इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीवर नव्या / इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीवर नव्या योजनांत लक्ष; आयटी सचिव अजयप्रकाश साहनी यांची माहिती 

Feb 12,2019 09:27:00 AM IST

नवी दिल्ली- सरकारच्या नव्या योजनांमध्ये देशात इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीच नाही, तर भारताला अशा निर्यातीचे केंद्र बनण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी सचिव अजयप्रकाश साहनी यांनी ही माहिती दिली. एमएआयटीच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग समिट-२०१९'मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

त्यांनी सांगितले की, देशात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचे इकोसिस्टिममध्ये वाढ होत आहे. आपल्याला केवळ निर्मितीच नाही तर निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. नवीन धोरणात निर्यातीला प्रोत्साहन देण्याबरोबरच पुरवठा साखळीत भागीदारांची संख्या वाढवण्यावरही लक्ष केंद्रित केले जाईल.

साहनी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय कंपन्या डिझाइन आणि नवीन उत्पादन/सेवांच्या आरअँडडीसाठी आधीपासूनच भारतीय पद्धतीचा वापर करत आहेत. देशात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचे इको सिस्टिम मजबुतीसह वाढत आहे. त्यामुळे आपण केवळ इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या बांधापर्यंत मर्यादित राहता कामा नये. देश जागतिक पुरवठा साखळीचा भाग कसा बनेल यावर आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे.

एमएआयटीचे अध्यक्ष नितीन कुनकोलिनकर यांनी सांगितले की, भारतात मागील काही महिन्यांपासून ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सची मागणी तेजीने वाढली आहे तरीदेखील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्मितीत आपण केवळ सुट्या भागांची बांधणी करण्यापर्यंतच मर्यादित आहोत. देशांतर्गत पातळीवर यांच्या निर्मितीमध्ये भारत जागतिक सरासरीच्याही बराच मागे आहे. मेक इन इंडियासारख्या योजनांमुळे देश जगातील इलेक्ट्रॉनिक्स बाजाराचा हब होण्यासाठी मदत मिळेल.

कार्यक्रमात उपस्थितीत असलेले सिस्कोचे वरिष्ठ उपाध्यक्ष (पुरवठा साखळी व्यवस्थापन) जॉन केर्न यांनी सांगितले की, जगासाठी भारत निर्यात करण्यासाठीचा देश आहे. या क्षेत्राला आणखी सवलती मिळाल्या तर देशात निर्मिती आणि पुरवठा चेन उद्योग उभा राहू शकतो, जो निर्यातीमध्ये जागतिक पातळीवर स्पर्धात्मक टक्कर देऊ शकेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

X