ऑनलाइन शाॅपिंगनंतर गिफ्ट / ऑनलाइन शाॅपिंगनंतर गिफ्ट व्हाउचर : फसवणुकीचा नवा फंडा

शॉपिंग संकेतस्थळांवरील आकर्षक ऑफर्स आणि भेटवस्तूंच्या मोहात अनेकांचे महत्त्वाच्या गोष्टींकडे हाेते दुर्लक्ष

Dec 22,2018 10:27:00 AM IST

नाशिक- घरबसल्या इंटरनेटचा उपयाेग करून ऑनलाइन शॉपिंगच्या साइटवरून खरेदी करण्याची क्रेझ सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही खरेदी आनंददायी वाटत असली तरी काही ग्राहकांची यात फसवणूक होत आहे. शिवाय अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात दाद मागणेही अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. आपण खरेदीसाठी एखाद्या दुकानात जातो तेव्हा अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी तपासून घेतो. जी वस्तू घ्यायची आहे तिचा दर्जा व किंमत, विविध स्पर्धक कंपन्यांच्या वस्तूंचा दर्जा व किंमत, दुकानदाराकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स या सर्व गोष्टी आपण डोळसपणे पहात असतोच. पण, दुकानातून बाहेर पडताना आपली पर्स किंवा पाकीट मागे राहिले नाही ना, दुकानदाराने योग्य पावतीच दिली आहे ना, आपल्याला हवी तीच वस्तू मिळाली आहे ना, डेबिट, क्रेडिट कार्डचा पिन नंबर कुणी पहात तर नाही ना.. या सर्वाची आपण खात्री करत असतो. पण दुर्दैवाने ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकांचा हा डोळसपणा गायब होतो.

शॉपिंग संकेतस्थळांवरून दिल्या जाणाऱ्या आकर्षक ऑफर्स आणि भेटवस्तूंच्या मोहात अनेकजण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि मग त्याचा त्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागतो. सध्या ग्राहकांच्या याच निष्काळजीपणाचा गैरफायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. नेहमी ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची माहिती लिक करत घरापर्यंत पोस्टाने गिफ्ट व्हाउचर पाठवत ग्राहकांची लाखोची फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे.

१० लाखांची बक्षिसं मिळवा, आधी १० हजार रुपये खात्यात भरा
शहरातील अनेक नागरिकांना सध्या विविध ऑनलाइन कंपन्यांच्या नावाने गिफ्ट लागल्याचे एसएमएस, इ-मेलसह पोस्टाने घरी गिफ्ट व्हाउचर येत आहे. 'व्हाउटर स्क्रेच करा आणि लाखो रुपये जिंका' असे पत्रात लिहिण्यात आलेले आहे. तसेच व्हाउचर स्क्रॅच केल्यानंतर त्यात दहा लाख जिंकल्याचे दाखविले जात आहे. यानंतर विविध हेल्पलाइन नंबरवर एसएमएस करण्याचे सांगितले जात आहे. तसेच फाेनवर संपर्क साधत 'आपण दहा लाख रुपये जिंकले असून तत्काळ टॅक्स व इतर शुल्क असे दहा हजार रुपये खात्यात टाका' असे सांगितले जात आहे. पैसे टाकल्यानंतर फोन बंद केले जात आहे. मात्र, नागरिक अशा प्रकारांना भुलून असे पैसे गुंतवतात अाणि त्यांची फसवणूक हाेते. फसवणूक झाल्यावर त्याची तक्रार कुठे करावी याबाबतही अनेकजण अनभिज्ञ आहेत.

शॉपक्लूजच्या लेटरहेड, शिक्क्यांचा वापर
अनेक विद्यार्थ्यांसह नेहमी ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना शॉपक्लूज या ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या नावाचे लेटरहेड, शिक्का तयार करत ग्राहकांचा डेटा लिक करून प्रत्येक ग्राहकाच्या घरी पोस्टाने गिफ्ट व्हाउचर जिंकल्याचे पत्र पाठविले जात आहे. प्रत्येक लेटरहेडवर कंपनीचा वेगवेगळा पत्ता टाकण्यात आलेला आहे. तर हेल्पलाइन नंबरदेखील बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. तर अनेकजण पत्ता शाेधत आहेत.

..तर टळणार फसवणूक
ऑनलाइन शॉपिंगला सध्या मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते आहे. ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी देण्यात येत असलेल्या ऑफर आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या वस्तूच्या रकमेपेक्षा कमी किंमत असल्यामुळे ऑनलाइन शॉपिंगला आता पहिली पसंती दिली जाते; मात्र त्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहक म्हणून आपल्या वाट्याला येणारी संभाव्य फसवणूक टाळली जाऊ शकते.

दर महिन्यात दाखल होतेय तक्रार
सध्या नागरिक भ्रमणध्वनीवरूनच वस्तू बुक (आरक्षित) करतात आणि साधारणपणे ७ ते ८ दिवसांत आपण आरक्षित केलेली वस्तू घरपोच पाेहाेचते. सुरुवातीला नवीन असेपर्यंत वस्तूंविषयी काहीच वाटत नाही. मात्र, नंतर त्यात काही बिघाड झाला तर ग्राहकांना दुकानाचे नाव, कंपनीचा पत्ता, कस्टमर केअर नंबर या सर्व गोष्टी शाेधण्याची गरज पडते. यासंदर्भात आपण सुरुवातीला कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचे लक्षात येते आणि नंतर मनस्ताप होतो. अशाप्रकारे फसवणूक झाल्याच्या दोन तरी तक्रारी महिन्याला ग्राहक न्यायालयात दाखल होत आहेत.

X