आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - शिवसेनेसाेबत सत्तेत सहभागी हाेण्यासाठी पक्षाध्यक्षा साेनिया गांधी यांचे मन वळवण्यात अखेर राज्यातील काँग्रेस नेत्यांना यश आले. साेनियांकडून हाेकार मिळाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांत बुधवारी रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यात तब्बल साडेपाच तास खलबते झाली. पवार व काँग्रेस महासचिव अहमद पटेल यांच्यासह दाेन्ही पक्षांचे १५ नेते या वेळी उपस्थित हाेते. किमान समान कार्यक्रमाबाबत यात सुरुवातीच्या टप्प्यात एकमत झाले, नंतर सत्तेतील पदांच्या वाटपाबाबतही चर्चा झाली. ३ तासांच्या चर्चेनंतर काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे साेनियांच्या बंगल्यावर गेले. बैठकीतील चर्चेची माहिती त्यांनी साेनियांना दिली. त्यांचा निराेप घेऊन पुन्हा हे नेते पवारांच्या बंगल्यावर येऊन चर्चेत सहभागी झाले.
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपद पहिली अडीच वर्षे सेनेला तर दुसरे अडीच वर्षे राष्ट्रवादीला मिळू शकते. तर उपमुख्यमंत्रिपद पाच वर्षे काँग्रेसला दिले जाऊ शकते. ३० नाेव्हेंबरपूर्वी सरकार सत्तारूढ हाेईल.’ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘राज्याला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुरुवारी दिल्लीत बैठक हाेईल. शुक्रवारी शिवसेना नेत्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय हाेऊ शकताे.’
साेनियांच्या हाेकारानंतर हालचालींना आला वेग
अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी बुधवारी दुपारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यात सोनियांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापण्यास हिरवा कंदील दर्शवला.
नंतरच दाेन्ही काँग्रेसची पवारांकडे बैठक झाली. यादरम्यान काँग्रेसचे नेते अश्विनीकुमार यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली.
पाचच दिवसांत सरकार स्थापणार : संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. ती आता सुरू झाली आहे. येत्या २ ते ५ दिवसांत राज्यात सरकार स्थापन करू. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही राज्यातील जनतेचीच भावना आहे. लवकरच गाेड बातमी मिळेल. पेढ्यांची ऑर्डरही दिली आहे असे समजा,’ असे सूचक वक्तव्य राऊतांनी केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.