Employment / वाहन, बँक, विमा आणि पायाभूतसह प्रमुख क्षेत्रांत नव्या नाेकऱ्यांचा वेग मंदावला; २०१९ मध्ये नवीन नाेकऱ्यांचे प्रमाण जवळपास २ टक्क्यांनी कमी

मागणी कमी झाल्याने अर्थव्यवस्थेशी​​​​​​​ संबंधित क्षेत्रावर वाईट परिणाम, अनेक क्षेत्रांत नवीन राेजगाराच्या संधी मावळल्या

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 22,2019 10:04:00 AM IST

नवी दिल्ली - देशातील घटलेली मागणी लक्षात घेता भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रे सध्या नरमाईच्या वातावरणातून वाटचाल करीत असून त्याचा परिणाम अनेक नाेकऱ्यांवर झाला आहे. बँका, विमा, वाहन, लाॅजिस्टिक आणि पायाभूत यासह अनेक प्रमुख क्षेत्रांतल्या कंपन्यांमध्ये या वर्षात नव्या नाेकऱ्या मिळण्याचा वेग १.९ % घटला असल्याची नाेंद झाली असल्याची माहिती केअर रेटिंग लिमिटेडच्या नव्या अभ्यासामध्ये समाेर आली आहे. केअरने १००० कंपन्यांनी मार्चमध्ये सादर केलेल्या वार्षिक अहवालाचा आधार घेतला आहे. मार्च २०१७ मध्ये ५४ लाख ४० हजार नवीन राेजगार निर्माण झाले हाेते. २०१८ मध्ये त्यात ६.२ % वाढ हाेऊन ५७.८० लाखांवर गेले. केअरच्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत केवळ ४.३ % वाढ हाेऊन ६०.३० लाख नाेकऱ्यांची निर्मिती झाली. एकमेव सेवा क्षेत्रातच जास्त नाेकऱ्या उपलब्ध झाल्या. हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. केअरच्या मते लाेह, स्टील आणि खाणकाम कंपन्यांमध्ये नाेकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. उत्पादनातील घट आणि अनेक कंपन्यांची दिवाळखाेरी हे याचे मुख्य कारण मानले जाते. बँकिंग क्षेत्र आपल्या संपत्तीमुळे जास्त तणावाखाली आहे. अनेक बँकांमध्ये झालेले घाेटाळे व एनपीए याचे मुख्य कारण आहे.

पारले : १० हजार कर्मचाऱ्यांची हाेऊ शकते कपात

पारले ही देशातील सर्वात माेठी बिस्कीट उत्पादक कंपनी १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. कंपनीचे कॅटेगरी प्रमुख मयंक शहांनी सांगितले, ग्रामीण भागात बिस्किटांची विक्री घटल्याने कंपनी उत्पादन कपात करू शकते. त्यामुळे कर्मचारी कपात हाेण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यावर पारले जीची विक्री ७-८ % घटली आहे. आम्ही १०० रुपये प्रतिकिलाे वा त्यापेक्षा कमी बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे.

वाहन : १५ हजार बेराेजगार, १० लाख नाेकऱ्यांवर गदा

सध्याच्या मरगळीने वाहन क्षेत्राची स्थिती जास्त खराब आहे. या क्षेत्रात १५ हजार जण बेराेजगार झाले आहेत. ‘सियाम’चे महासंचालक विष्णु माथूर म्हणाले, वाहन उद्याेगाने ३.७ काेटी पेक्षा जास्त जणांना राेजगार दिला आहे. मरगळ संपली नाही तर आणखी नाेकऱ्या जातील, आॅटाे कंपाेनंट मॅन्युफॅक्चरर्सने एका अहवालामध्ये येणाऱ्या महिन्यात १० लाख नाेकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली आहे. सियामच्या अहवालानुसार देशातील वाहनांची एकूण विक्री जुलैमध्ये १८.७१ % घटून १८,२५,१४८ युनिट‌्स झाली.

वस्त्राेद्याेग : संघटना म्हणते, एक तृतीयांश सूतगिरण्या बंद
नाॅर्दर्न इंडिया टेक्स्टाइल मिल्स काॅर्पाेरेशन संघटनेने दावा करताना देशातील सूत उद्याेगावर सध्या जास्त संकट आहे. यामुळे अनेक नाेकऱ्या जात आहेत. देशातल्या एकतृतीयांश सूतगिरण्या बंद झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. ज्या गिरण्या सुरू आहेत त्या खूप ताेट्यात आहेत. सूत निर्यात ३३ % घटली आहे. कापूस खरेदी करण्याची या गिरण्यांची ताकद नाही. अशीच स्थिती राहिली तर कापसाच्या पुढच्या पिकासाठी काेणी खरेदीदार राहणार नाही. त्याचा परिणाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरही हाेईल.


बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या संकटाचा चाैफेर परिणाम
सध्या बँकेतर वित्त पुरवठा कंपनी क्षेत्रही संकटातून जात आहे. काही माेठ्या कंपन्यांनी केलेले घाेटाळे आणि कर्जाची चणचण यामुळे हे क्षेत्र अडचणीत सापडले आहे. आयएलअँडएफस ही देशातील सर्वात माेठी कर्ज वितरक कंपनी स्वत: कर्जाच्या खाईत अडकली आहे. या कंपनीवर ९० हजार काेटी रुपयांचे कर्ज आहे. एनबीएफसीच्या राेकड संकटामुळे अन्य क्षेत्रातील मागणीवर विपरीत परिणाम झाला आहे. वाहन, रिअल इस्टेट क्षेत्र एनबीएफसीसाठी संकटकारक ठरल्याचे मानले जाते.

X
COMMENT